नवी दिल्ली - कोरोना काळात हमखास डिजिटल व्यवहार केले जात आहेत. याच दरम्यान ऑनलाईन फ्रॉड्सचं प्रमाणही वाढलं आहे. एका व्यावसायिकाला स्मार्टफोनने थेट कंगाल बनवलं आहे. अवघ्या काही सेकंदात अकाऊंटमधून तब्बल 64 लाख चोरी झाले आहेत. ऑनलाईन फ्रॉडचा हा धक्कादायक प्रकार समोर आला असून वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. जयपूरमध्ये ही घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी जयपूरमधील एका व्यावसायिकाने आपल्या स्मार्टफोनवर दोन दिवस सतत काहीतरी विचित्र एक्टिव्हिटी पाहिल्या. व्यावसायिकाच्या अकाऊंटमधून त्यानंतर 64 लाख रुपये चोरी झाल्याचं समोर आलं. हे प्रकरण सीम स्वॅपिंग फ्रॉड (SIM Swaping Fraud) बाबत असल्याचं समोर आलं. इतकी मोठी रक्कम चोरी झाल्यानंतर व्यवसायिकाने पोलिसांत संपर्क केला. पोलिसांनी हा हॅकिंगचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली.
व्यावसायिकांच्या स्मार्टफोनचे सिग्नल शुक्रवारी अचानक गायब झाले. कितीतरी वेळ वाट पाहूनही सिग्नल परत न आल्याने त्यांनी नवं सीम कार्ड घेण्याचा निर्णय घेतला. हीच बाब त्यांच्या बिजनेस पार्टनरसह घडली. मोबाईल सिग्नल गेला होता. दोघांनी नवं सीम कार्ड घेण्याचा निर्णय घेतला. नवं सीम कार्ड घेतलं, पण ते एक्टिव्हेट होण्यासाठी बराच काळ गेला. त्यानंतर दोघांनी आपल्या फोनमध्ये कंपनीच्या आणि पर्सनल अकाउंट्समध्ये लॉगइन केलं. पण लॉगइन करता येत नव्हतं.
लॉगइन होत नसल्याने त्यांनी बँकेत विचारणा केली अकाउंट बॅलेन्सबाबत माहिती विचारली. त्यावेळी त्यांच्या अकाउंटमधून 64 लाख रुपये चोरी झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये केवळ 700 रुपये राहिले. आता पोलीस याबाबत पुढील तपास करत असून स्मार्टफोनमधील संपूर्ण एक्टिविटीवर लक्ष ठेवत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.