जिओनी कंपनीने आपल्या जिओनी ए मालिकेतील ए१ प्लस आणि ए१ लाईट या स्मार्टफोन्सचे मूल्य अनुक्रमे ३,००० आणि १,००० रूपयांनी कमी केले असून यासोबत काही ऑफर्सदेखील दिल्या आहेत.
जिओनी ए१ प्लस आणि ए१ लाईट हे स्मार्टफोन्स ग्राहकांना अनुक्रमे २६,९९९ आणि १४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले होते. यात अनुक्रमे ३,००० आणि १,००० रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे आता यांचे मूल्य अनुक्रमे २३,९९९ आणि १३,९९९ रूपये इतके आहे. याशिवाय या दोन्ही स्मार्टफोन्ससोबत जिओनी कंपनीने खास ऑफर्सदेखील देऊ केल्या आहेत. ए१ लाईट हे मॉडेल खरेदी करणार्या एयरटेलच्या विद्यमान वा नवीन ग्राहकाला १ जीबी वा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर सहा महिन्यांपर्यंत दरमहा १० जीबी फोर-जी डाटा मोफत मिळणार आहे. तर ए१ प्लसच्या ग्राहकांना जिओने ३०९ रूपयांच्या रिचार्जवर ६० जीबी अतिरिक्त डाटा मिळेल. तर या दोन्ही स्मार्टफोन्ससाठी पेटीएमने आपल्या पेटीएम मॉलवरून किमान ३५० रूपयांच्या खरेदीवर कॅशबॅक देण्याचे जाहीर केले आहे.
जिओनी ए१ प्लस मॉडेलमध्ये मागच्या बाजूला १३ मेगापिक्सल्स आणि ५ मेगापिक्सल्स असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. यात ४५५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर जिओनी ए १ प्लस या मॉडेलमध्ये सहा इंच आकारमानाचा फुल एचडी क्षमतेचा २.५ डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ हे संरक्षक आवरण असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर जिओनी कंपनीचा अमिगो ४.० हा युजर इंटरफेस असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.
तर दुसरीकडे जिओनी ए१ लाईट या मॉडेलमधील फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सल्स क्षमतेचा तर याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये यात ५.३ इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ हे संरक्षक आवरण असेल. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.