कुलपॅड कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप तसेच फेस अनलॉक या विशेष फिचरने सज्ज असणारा नवीन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.
कुलपॅड कंपनीने आपला मेगा ५ ए हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. याचे मूल्य ६,९९९ रूपये असून याला फक्त ऑफलाईन या प्रकारात उपलब्ध करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हा स्मार्टफोन महाराष्ट्रासह आठ अन्य राज्यांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून लवकरच याला अन्य राज्यांमध्येही सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये याला ऑनलाईन पद्धतीत उपलब्ध करण्यात येईल असेही मानले जात आहे.
कुलपॅड मेगा ५ ए या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा हा ऑटो-फोकस प्रणालीने युक्त असून यात एलईडी फ्लॅशदेखील देण्यात आला आहे. याची क्षमता ८ मेगापिक्सल्स इतकी आहे. तर यातील दुसरा कॅमेरा हा ०.३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असणार आहे. या दोन्ही कॅमेर्यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्याच मदतीने यात फेस अनलॉक हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या प्रणालीवर चालणारे असून यामध्ये २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
कुलपॅड मेगा ५ ए या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा असून यावर २.५डी वक्राकार ग्लासचे संरक्षक आवरण दिलेले आहे. यामध्ये क्वॉड-कोअर स्प्रेडट्रम एससी९८५०के हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. या मॉडेलला बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी शाओमी रेडमी ५ए या लोकप्रिय स्मार्टफोनसह अलीकडेच सादर करण्यात आलेल्या टेक्नो कॅमॉन आयएस आणि इनफिनीक्स स्मार्ट २ या मॉडेल्सशी चुरशीची स्पर्धा करावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.