मुंबई - भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत प्रचंड तेजी असून यामुळे यावर्षी विक्रमी विक्री होणार असल्याची चुणूक आयडीसी संस्थेच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
जागतिक पातळीवर स्मार्टफोन विक्रीची गती काहीशी मंदावली आहे. यावर अनेक दिवसांपासून चर्चादेखील करण्यात येत आहे. काही तज्ज्ञांनी तर लवकरच आपण स्मार्टफोनकडून वेअरेबल्सच्या युगाकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादनदेखील केले आहे. तथापि, याच्या अगदी विरूध्द वातावरण भारतीय बाजारपेठेत असल्याचे दिसून येत आहे. आयडीसी म्हणजेच इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन या संस्थेने भारतीय मार्केटमध्ये पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०१८) विकल्या गेलेल्या स्मार्टफोनबाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यातील आकडेवारी पाहता भारतात यावर्षी प्रचंड तेजी असून पहिल्यांदाच १० टक्क्यांच्या वर विक्रीत वृध्दी नोंदवली जाणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.
आयडीसीच्या अहवालानुसार गत तिमाहीमध्ये भारतात तब्बल ३० दशलक्ष म्हणजेच तीन कोटी स्मार्टफोन विकले गेलेत. गेल्या वर्षीच्या याच कालखंडातील विक्रीपेक्षा यावर्षी ११ टक्क्यांची वाढ झाल्याचे यातून निदर्शनास आले आहे. हाच ट्रेंड या संपूर्ण वर्षभरात कायम राहणार असल्याचे प्रतिपादन या संस्थेने केले आहे. यामुळे पहिल्यांदाच १० टक्क्यांपेक्षा जास्त गतीने विक्रीत वृध्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या तिमाहीचा विचार करता शाओमी कंपनी पहिल्या तर सॅमसंग दुसर्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. तिसर्या स्थानावर ओप्पोने झेप घेतली असून विवोला चौथ्या क्रमांकावर जावे लागले आहे. पाचव्या क्रमांकावर पहिल्यांदाच ट्रान्ससिऑनचा प्रवेश झाला आहे. या कंपनीची मालकी असणार्या आयटेल, टेक्नो आणि इनफिनीक्स या ब्रँडच्या चांगल्या कामगिरीमुळे ही बाब शक्य झाल्याचे मानले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर असणार्या सॅमसंगला मागे सारून शाओमीने सुमारे ३० टक्के मार्केट शेअरसह पहिला क्रमांक पटकावला आहे. तर २५ टक्के वाट्यासह सॅमसंग दुसर्या क्रमांकावर गेली आहे.
दरम्यान, स्मार्टफोनसह फोर-जी फिचरफोनच्या विक्रीतही विलक्षण गती आल्याचे आयडीसीने नमूद केले आहे. यात जिओने तब्बल ३८.४ टक्के वाट्यासह पहिला क्रमांक पटकावला असून १०.४ टक्के मार्केट शेअरसह सॅमसंग दुसर्या क्रमांकावर आहे. यानंतर ट्रान्ससिऑन, लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांचा क्रमांक असल्याचा या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विविध कंपन्यांमध्ये सुरू असणारी तीव्र स्पर्धा पाहता फोर-जी फिचरफोनच्या क्षेत्रातही तेजी राहणार असल्याचे भाकीत आयडीसीने केले आहे.