नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे लोक आपला बराचसा वेळ स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर घालवतात. सायबर गुन्हेगार नेमकी हीच संधी साधतात आणि याचा फायदा उचलतात. गेल्या काही महिन्यांत सायबर गुन्हेगारीची (Cyber Crime) प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. गुन्हेगार काही मिनिटांतच आपले बँक खाते रिकामे करतात. त्यासाठी नवनवीन फंडे वापरतात. फसवणुकीच्या अनेक पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे वेबसाईट स्मिसिंग (Smishing) आहे.
स्मिसिंग म्हणजे नेमकं काय?
एसएमएस आणि फिशिंग या दोन्हींचा यामध्ये समावेश आहे. देशभरातील लोकांना मेसेज पाठविण्यात येतो. यामध्ये तुमचं अकाऊंट अपडेट करण्याची गरज आहे किंवा नव्या प्रोग्रामसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे असं सांगितलं जातं. मेसेज मध्ये लिंक आणि टोल फ्री नंबरचा वापर केला जातो. अशा पद्धतीने लोकांची मोठ्या प्रमाणात सध्या फसवणूक करण्यात येत आहे.
अशी घ्या काळजी
- तुमच्या फोनमध्ये कधीही व्हायरस येऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रथम कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर कधीच क्लिक करू नका.
- ईमेल किंवा मेसेजवरून ईमेलवरून मिळालेली कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका
- बँकेला त्यांचे नावे किंवा लोगो वापरणाऱ्या संशयास्पद ईमेलबद्दल माहिती द्या
- फसवणूक किंवा खात्याशी केलेली छेडछाड ओळखण्यासाठी आपले खाते नियमितपणे तपासा
- आपली वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी बँक कधीही एसएमएस पाठवत नाही हे लक्षात ठेवा.
- जर तुम्हाला तुमच्या इंटरनेट बँकिंग सिक्युरिटीचे तपशील जसे की पिन, पासवर्ड किंवा ईमेलमध्ये खाते क्रमांक मागितला जात असेल, तर तो कोणालाही देऊ नका.
स्पूफिंग हा ही एक बँक फसवणुकीचा प्रकार आहे. आजकाल मोठ्या संख्येने प्रकरणे समोर येत आहेत. वेबसाईट स्पूफिंगमध्ये बनावट वेबसाईट तयार करून, सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाच्या मदतीने खातेदाराची फसवणूक करतात. या बनावट वेबसाईट्स खऱ्या दिसण्यासाठी गुन्हेगार खऱ्या वेबसाईटचं नाव, लोगो, ग्राफिक्स आणि कोडदेखील वापरतात. ते ब्राउझर विंडोच्या दिसणारे बनावट यूआरएल (URL) देखील तयार करू शकतात. ते बाजूला पॅडलॉक आयकॉनची कॉपी करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.