नवी दिल्ली: एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मचे सर्व्हर डाऊन झाले आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून युजर्संना X वर कोणतीही पोस्ट दिसत नसल्याचे समोर येत आहे. X प्लॅटफॉर्म ओपन केल्यानंतर 'आपले स्वागत' असं लिहून येत आहे. पण त्यानंतर कोणतीही पोस्ट दिसत नाही. मोबाइल आणि डेस्कटॉप या दोन्ही वापरकर्त्यांना ही समस्या जाणवत आहे. सध्या कुणाच्या प्रोफाईलवर गेल्यावरही त्या युजर्सची पोस्ट दिसत नाही. भारतासह जगभरात हीच समस्या जाणवत असल्याचं समोर येत आहे. Xचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे युजर्संना मोठा फटका बसला आहे.
Downdetector ने देखील 'एक्स'चं सर्व्हर डाऊन असल्याची पुष्टी केली आहे. अवघ्या काही मिनिटांत २५०० युजर्संनी डाउनडिटेक्टरवर तक्रार केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे #TwitterDown हे X वर ट्रेडिंगवर दिसतंय पण त्यावर क्लिक केल्यानंतर कोणतीही पोस्ट दिसत नाही.
X हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून हे प्लॅटफॉर्म गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. वास्तविक, गेल्या वर्षी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलोन मस्कने विकत घेतले होते. त्यानंतर त्याचे नाव ट्विटर होते, यावर्षी या प्लॅटफॉर्मचे नाव बदलून X असे करण्यात आले आहे. हे एक लोकप्रिय व्यासपीठ आहे, ज्यावर अनेक मोठे सेलिब्रिटी आणि राजकारणी लोकांचे अकाऊंट उपलब्ध आहेत.