नवी दिल्ली: भारतात कोविड वॅक्सीनचं वितरण करणं कठीण काम आहे, कारण लस योग्य त्या तापमानावर साठवून ठेवावी लागते. तापमान वाढल्यास लस खराब होऊ शकते. त्यामुळे दुर्गम भागात किंवा जिथे वीज नाही अशा भागात लस पोहोचवतना अनेक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजीनियरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने सौर उर्जेवर चालणाऱ्या रेफ्रिजरेटरची निर्मिती केली आहे.
समरजीत सिंह असं या विद्यार्थ्याचं नाव आहे, तो सध्या कानपुरमधील अॅक्सिस कॉलेजमध्ये बी.टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. समरजीतनं आरोग्य केंद्रांवर विजेचा अभाव असल्याच्या समस्येवर उपाय शोधला आहे. सौर उर्जेवर चालणारा हा रेफ्रिजरेटर जीवनावश्यक औषध आणि लसी सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. जिथे वीज नाही किंवा वीज वारंवार जाते अशा ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी हा फ्रिज खूप उपयुक्त ठरेल.
हा फ्रिज चार तास उन्हात चार्ज केल्यावर 12 तास आतील वस्तू थंड ठेवण्याचे काम करतो. यासाठी फ्रिजमध्ये अतिरिक्त बॅटरी देण्यात आली आहे. याची क्षमता 5 लिटर ठेवण्यात आली आहे. वजन कमी असल्यामुळे हा कुठेही सहज नेता येतो. समरजीतनं फ्रिजमध्ये कंप्रेसरच्या ऐवजी थर्मोइलेक्ट्रिकचा वापर केला आहे. या फ्रिजला विजेची आवश्यकता नाही.
समरजीतनं या फ्रिजच्या पेटंटसाठी देखील अर्ज दिला आहे. “मी एक सौर फ्रिज बनवला आहे. यात कंप्रेसरचा वापर न करता डिवाइसचा प्रोटोटाइप बनवला आहे,” असं समरजीतनं म्हटलं आहे. हा डिवाइस सौर उर्जेचा वापर करतो त्यामुळे पर्यावरणाची देखील रक्षा होते. हा डिवाइस बनवण्यासाठी 3,000 ते 3,500 रुपये खर्च आला आहे.
समरजीतनं म्हटलं आहे की, सौर पॅनलचा वापर करणारा हा रेफ्रिजरेटर वीज नसलेल्या भागांमध्ये आपल्या देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी देखील उपयुक्त ठरेल. या डिवाइसमधून सैनिकांना थंड पाणी तर मिळेलच परंतु आवश्यक असलेली इंजेक्शन, औषधं आणि खाण्यापिण्याचे पदार्थ देखील थंड राहतील.