स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. त्याच्या मदतीने, कॉलिंग आणि कनेक्टिव्हिटी खूप सोपं झालं, परंतु ते देखील कधीकधी समस्या देखील बनतात. विशेषत: फोन चार्जिंग करताना काही चुका करणं हे अनेकांसाठी धोकादायक ठरलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये भयंकर घटना घडली आहे. शॉक लागल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षांचा मुलगा फोन चार्ज करण्यासाठी रात्री उठला होता, तेव्हा त्याला शॉक लागला. मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या आईला देखील शॉक लागला आणि तिनेही यामध्ये जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. फोन चार्ज करताना केलेला निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत फोन चार्ज करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया...
फोन चार्जिंग करताना एखादी छोटीशी चूकही घातक ठरू शकते. बरेच लोक लोकल बॅटरी वापरतात. त्यामुळे फोनला आग लागण्यासारखी प्रकरणे समोर आली आहेत. युजरने नेहमी चार्जिंगसाठी मूळ चार्जर वापरावा. लोकल चार्जरमुळे अनेकवेळा फोन जास्त गरम होऊन स्फोट होतो. लोकल बॅटरी आणि चार्जर खरेदी केल्याने तुमचा पैसा तर वाया जाईलच, शिवाय जीवाला धोका निर्माण होईल. याशिवाय फोन जास्त वेळ चार्जिंगवर ठेवणं देखील धोक्याचं आहे.
चार्जिंग करताना फोन वापरणं देखील खूप धोकादायक आहे. यामुळे फोन खराब होण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा आपण फोन चार्ज करताना गेम खेळत राहतो. हा मोठा धोका असू शकतो. कारण त्यावेळी फोनमधून खूप उष्णता बाहेर पडत असते. अशा परिस्थितीत स्फोट होण्याची शक्यता वाढते. याशिवाय लिथियम आयन बॅटरी फुगण्याची समस्याही दिसून येते. तुमच्या फोनची बॅटरीही फुगत असेल, तर ती लगेच बदलून घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.