वाढत्या स्पर्धेमुळे सोनी कंपनीने आपल्या तीन लोकप्रिय स्मार्टफोन्सवर ग्राहकांना अतिशय आकर्षक अशी सवलत जाहीर केली आहे.
सध्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे बहुतांश कंपन्या आपल्या मॉडेल्सच्या मूल्यात सातत्याने कपात करत आहेत. या पार्श्वभूमीवर सोनी कंपनीने आपल्या सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस, एक्सपेरिया एल२ आणि एक्सपेरिया आर१ या तीन मॉडेल्सच्या मूल्यात घसघशीत स्वरूपाची कपात जाहीर केली आहे. मूल्यातील ही कपात अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टल्ससह सोनीच्या देशभरातील शोरूम्समधूनही मिळणार असल्याचे या कंपनीने जाहीर केले आहे. सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस हा स्मार्टफोन भारतात ३९,९९० रूपयात लाँच करण्यात आला होता. आता यामध्ये तब्बल १० हजारांची कपात करण्यात आली असून हे मॉडेल २९,९९० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सोनी एक्सपेरिया एल२ हा स्मार्टफोन बाजारपेठेत १९,९९० रूपयात उपलब्ध होता. आता हेच मॉडेल १४,४९० रूपयात मिळणार आहे. अर्थात यावर कंपनीने ५ हजारांची सवलत दिली आहे. तर आधी १०,९९० रूपयात मिळणारा सोनी एक्सपेरिया आर१ हा स्मार्टफोन एक हजार रूपयांनी कमी मूल्यात म्हणजेच ९,९९० रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८२० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेजसाठी ३२/६४ जीबीचे पर्याय देण्यात आले आहेत. सोनी एक्सपेरिया एल२ या मॉडेलमधील ५.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आहे. क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम ३ जीबी असून ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले आहे. तर, सोनी एक्सपेरिया आर१ या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके आहे.