सोनी कंपनीने आपल्या प्लेस्टेशन४ (पीएस४) या गेमिंग कन्सोलच्या स्लीम मॉडेलची मर्यादीत आवृत्ती भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
पीएस ४ स्लीम हे मॉडेल ग्राहकांना सोनेरी आणि चंदेरी या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. या वर्षाच्या प्रारंभी पीएस ४ स्लीम हा कन्सोल भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला होता. जून महिन्यात युरोप व अमेरिकेत याची मर्यादीत आवृत्ती सादर करण्यात आली होती. आता हीच आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. हा गेमिंग कन्सोल ग्राहकांना फक्त सोनी कंपनीच्या शॉपीजमधून खरेदी करता येईल. अन्य शॉपीज तसेच शॉपींग पोर्टलवरून याला उपलब्ध करण्यात आलेले नाही. आधीची आवृत्ती ही ५०० जीबी आणि १ टेराबाईट या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली होती. तथापि, प्रस्तुत मर्यादीत आवृत्ती फक्त ५०० जीबी इनबिल्ट स्टोअरेजसह सादर करण्यात आली असून याचे मूल्य ३२,९९० रूपये आहे. याच्या सोबत कोणत्याही गेमची प्रिमीयम मेंबरशीप प्रदान करण्यात आलेली नाही हे विशेष.
पीएस ४ स्लीमच्या मर्यादीत आवृत्तीमधील बहुतांश फिचर्स हे मूळ मॉडेलप्रमाणेच आहेत. नावातच नमूद असल्यानुसार सोनीच्या प्लेस्टेशन ४ या गेमिंग कन्सोलची ही थोडी कमी फिचर्स असणारी आवृत्ती आहे. हा कन्सोल अन्य व्हेरियंटपेक्षा वजनाने हलका आणि स्लीम आहे. मात्र मूळ पीएस ४ इतके यात फिचर्स नाहीत. याच्या पुढील बाजूस दोन युएसबी पोर्ट आहेत. याशिवाय यात एचडीएमआय, इथरनेट व ऑक्झ पोर्ट दिलेले आहेत. यात वाय-फाय कनेक्टिव्हिटीदेखील प्रदान करण्यात आली असली तरी ऑडिओ आऊटपुट दिलेले नाही. यात एचडीआरयुक्त फोर-के क्षमतेच्या व्हिडीओचा सपोर्ट देण्यात आला आहे. याच्या सोबत अतिशय उत्तम दर्जाचा कंट्रोलर असेल. तर यात अन्य मॉडेल्सच्या तुलनेत दर्जेदार पॉवर इंडिकेटर प्रदान करण्यात आले आहे.