बाजारपेठेत उत्तमोत्तम कॅमेर्यांनी सज्ज स्मार्टफोन असताना सोनी कंपनीने आता फोर-के एचडीआर क्षमतेच्या चित्रीकरणाची सुविधा असणारे मॉडेल लाँच केले आहे. स्मार्टफोनच्या कॅमेर्यात प्रतिमेसाठी मेगापिक्सल्ससह कॅमेर्यातील अन्य फिचर्सकडे पाहिले जाते. याच प्रकारे या कॅमेर्यातून करण्यात येणार्या व्हिडीओ चित्रीकरणाच्या क्षमतेचा मानकदेखील तितकाच महत्वाचा असतो. बहुतांश स्मार्टफोनमधील कॅमेर्यातून एचडी क्षमतेचे चित्रीकरण करता येते. मोजक्या उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्ये फोर-के क्षमतेचे चित्रीकरणदेखील करता येते.
सोनी कंपनीने भारतात सादर केलेल्या एक्सपेरिया एक्सझेड-२ या स्मार्टफोनमध्ये फोर-के एचडीआर (हाय डायनॅमिक रेंज) या अतिशय उच्च कोटीतल्या मानकावर आधारित व्हिडीओ शुटींगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हा या प्रकारातील जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यात गुगलच्या एआर कोअर प्रणालीचा सपोर्ट दिलेला आहे. याच्या मदतीने विस्तारीत सत्यता म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअॅलिटीवर आधारित अॅप्सची निर्मिती शक्य आहे. यासाठी यात १९ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला असून तो ९६० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या सुपर स्लो-मोशन गतीने चित्रीकरण करू शकतो. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असणार आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सझेड-२ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आणि १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यावर सुरक्षेसाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. वायरलेस चार्जिंगच्या सुविधेने सज्ज असणारी यातील बॅटरी ३,१८० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. याच्या पुढील बाजूस एस-फोर्स फ्रंट सराऊंड या ध्वनी प्रणालीने सज्ज स्पीकर्स असून याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. तर याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन वॉटर आणि डस्टप्रूफ असल्यामुळे अगदी कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येणार आहे. हे मॉडेल लिक्वीड ब्लॅक या रंगाच्या पर्यायात भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले असून याचे मूल्य ७२,९९० रूपये इतके आहे.