सोनी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी युबीपी-एक्स 700 हा एचडीआर तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारा ब्ल्यू-रे प्लेअर सादर करण्याची घोषणा केली आहे. अगदी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्समुळे आता बहुतांश लोक स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच व्हिडीओ पाहण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे साहजीकच डीव्हीडी प्लेअर अथवा ब्ल्यू-रे प्लेअरच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र आता अतिशय उच्च दर्जाचे टिव्ही अथवा डिस्प्ले उपलब्ध झाल्यामुळे फोर-के क्षमतेचे चित्रीकरण पाहण्याचा आनंद घेण्यासाठी एक वर्ग ब्ल्यू-रे प्लेअरकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने सोनी कंपनीने युबीपी-एक्स700 हे मॉडेल भारतीय ग्राहकांचा उपलब्ध केले आहे. याचे मूल्य २७,९९० रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल देशभरातील सोनी कंपनीच्या शोरूम्समधून खरेदी करता येणार आहे. यामध्ये हाय डायनॅमिक रेज अर्थात एचडीआर 10 या तंत्रज्ञानाचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे अतिशय उच्च दर्जाच्या चलचित्रांची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यावरील चित्र अगदी सजीव भासणार आहेत.
सोनी युबीपी-एक्स700 या मॉडेलच्या मदतीने अल्ट्रा एचडी अर्थात फोर-के क्षमतेचे चित्रीकरण डिस्प्लेवर पाहू शकणार आहे. अर्थात फुल एचडीपेक्षा तब्बल चार पटीने स्पष्ट आणि जीवंत चलचित्राची अनूभुती यातून घेता येणार आहे. यातून नेटफ्लिक्स, युट्युब अथवा अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील फोर-के क्षमतेचे व्हिडीओज पाहता येतील. यामध्ये एमपी 4 सह डीएसडी, एफएलएसी आदी व्हिडीओच्या विविध फॉर्मेटचा सपोर्ट दिलेला आहे. यामध्ये डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस-एक्स या प्रणालींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे यातील ध्वनी हा अतिशय सुस्पष्ट आणि थ्री-डायमेन्शनल या प्रकारातील असणार आहे. तसेच यामध्ये बाह्य स्पीकर्सला कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.