सध्या जगातील बहुतांश टेक कंपन्यांमध्ये स्मार्ट स्पीकरच्या क्षेत्रात चुरस सुरू असल्याचे दिसून येत आहे. गुगल असिस्टंटवर आधारित गुगल होम व अमेझॉनच्या अलेक्झावर आधारित इको मालिका यांच्यात आधीच तुंबळ लढाई सुरू आहे. तर अॅपल कंपनी आपला होमपॉड हा सिरी या व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट असणारा स्मार्ट स्पीकर लवकरच लाँच करणार आहे. यामध्ये आता सॅमसंग कंपनीदेखील उडी घेणार असल्यामुळे ही स्पर्धा अजूनच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ब्लूमबर्गमध्ये सविस्तर वृत्तांत देण्यात आला आहे. यानुसार पुढील वर्षाच्या पूर्वार्धात सॅमसंगचा स्मार्ट स्पीकर बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.खरं तर आपण ध्वनी आज्ञावलीच्या युगात केव्हाचाच प्रवेश केला आहे. स्मार्ट स्पीकर हा तर प्रारंभ आहे. लवकरच आपल्या घरातील सर्व उपकरणांना व्हाईस कमांडच्या मदतीने कार्यान्वित करता येणार आहे. तसेच ही सर्व उपकरणे एका स्मार्ट होम प्रणालीशी संलग्न होणार आहेत. याचा विचार करता सॅमसंगच्या स्मार्ट स्पीकरकडे टेकविश्वाचे लक्ष लागून आहे.
सॅमसंगने आपल्या बिक्सबी या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला कंपनीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस, गॅलेक्सी नोट ८ तसेच काही फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये प्रदान केले आहे. तर ऑक्टोबर महिन्यातच बिक्सबी २.० अर्थात याची नवीन आवृत्ती सादर केली आहे. या माध्यमातून बिक्सबीचा स्मार्टफोन व टॅबलेटच्या पलीकडे विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत: स्मार्ट होममधील विविध उपकरणे या असिस्टंटने कार्यान्वित होतील असे सॅमसंग कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे बिक्सबी हा असिस्टंट टिव्ही, फ्रिज, स्पीकर आदींसह घरातील अन्य उपकरणांमध्ये देण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा हा सॅमसंगच्या स्मार्ट स्पीकरचा असेल असे ब्लूमबर्गच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.