सॅमसंगने आधीच घडी होणार्या डिस्प्लेचे पेटंट घेतले आहे. याशिवाय, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये या प्रकारचा डिस्प्ले प्रदर्शीतदेखील करण्यात आला होता. तेव्हाच सॅमसंग कंपनी फोल्ड होणारी उपकरणे विकसित करत असल्याचे स्पष्ट झाले होते. यात स्मार्टफोनसह लॅपटॉप व टॅबलेटचा समावेश असेल असे मानले जात होते. मात्र अलीकडच्या घडामोडींचा मागोवा घेतला असता सॅमसंग कंपनी पहिल्यांदा घडी होणारा स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत मिळाले आहेत. याचे नाव गॅलेक्सी-एक्स असू शकते. खरं म्हणजे अलीकडेच अॅपल कंपनीने आयफोन-एक्स हे मॉडेल सादर केले आहे. या पार्श्वभूमिवर, सॅमसंग या नावाची कॉपी करणार का? याबाबत मात्र थोडा संभ्रम आहे. मध्यंतरी सॅमसंगचे गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लस तसेच गॅलेक्सी नोट ८ या फ्लॅगशीप मॉडेल्सला जगभरातील ग्राहकांचा अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आहे. यामुळे गॅलेक्सी एस ९ हे मॉडेलच्या आधी घडी होणारा स्मार्टफोन लाँच करणे सोयिस्कर राहू शकते. याचाच विचार करून सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन येत्या काही महिन्यात बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ९ हे मॉडेल एप्रिल २०१८ मध्ये अपेक्षित आहे. याआधी जानेवारी २०१८मध्ये होणार्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो वा त्याआधी हा नवीन स्मार्टफोन ग्राहकांना सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.
दरम्यान, विविध लीक्सच्या माध्यमातून सॅमसंगच्या घडी होणार्या स्मार्टफोनची माहिती जगासमोर आली आहे. याची बेंचमार्क करणार्या संकेतस्थळांवर लिस्टींगदेखील करण्यात आली आहे. येथे या मॉडेलचे एसएम-जी८८८८ असे सांकेतिक नावदेखील दिसून आले आहे. पहिल्यांदा हे मॉडेल दक्षिण कोरियात सादर केले जाण्याची शक्यता आहे. तर जागतिक बाजारपेठेत याचे मूल्य ६५० डॉलर्सच्या आसपास असेल असे मानले जात आहे