विवो कंपनी पुन्हा एकदा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन सादर करणार असून याचा टिझरदेखील जाहीर करण्यात आला आहे. विवो कंपनीने अलीकडेच विवो एक्स-२१ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. मात्र यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे इन-डिस्प्ले अर्थात डिस्पलेखालीच देण्यात आलेले फिंगरप्रिंट स्कॅनर होय. यानंतर ही कंपनी पुन्हा एकदा याच प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारणार आहे. १२ जून रोजी याला चीनमध्ये सादर करण्यात येणार असून याबाबत विवो कंपनीने एक टिझरदेखील जारी केला आहे. तसेच अलीकडेच गीकबेंच या स्मार्टफोनच्या विविध फंक्शन्सचे बेंचमार्कींग करणार्या संकेतस्थळावरही याची लिस्टींग करण्यात आली आहे. यातून या आगामी मॉडेल्सचे विविध फिचर्स जगासमोर आले आहेत.
यानुसार हा आगामी स्मार्टफोन 'विवो-नेक्स' (vivo nex) या नावाने सादर करण्यात येणार आहे. या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये विवोने अपेक्स या नावाने एक कन्सेप्ट फोन प्रदर्शीत केला होता. याचीच व्यावसायिक आवृत्ती म्हणजे विवो-नेक्स असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले असून यामध्ये वरील बाजूस नॉच नसेल अशी माहिती आता समोर आली आहे.याला दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात येणार असून एकात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ तर दुसर्यात स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर दिलेला असेल. या दोन्ही मॉडेल्समध्ये अनुक्रमे ८ व ४ जीबी रॅम दिलेले असेल. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असेल. यातील कॅमेर्यांची अचूक माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. तथापि, यामध्ये पॉप-अप या प्रकारातील फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो. यातील बॅटरी नेमकी किती क्षमतेची असेल याची माहिती मिळाली नसली तरी यात क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज ४+ या तंत्रज्ञानाचा सपोर्ट असेल असे मानले जात आहे.