मुंबई, दि. 10 - डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच पैसै ट्रान्सफर करण्याचं फीचर आणणार आहे. हे फीचर युझर्सना लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपबाबत वेळोवेळी माहिती लिक करणा-या @WABetaInfo या आयडीवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड 2.17.285 बीटा व्हर्जनमध्ये पेमेंट फीचरसाठी ऑप्शन देण्यात आलं असून ते अजून लपवून ठेवण्यात आलं आहे.
@WABetaInfo ने पेमेंट फीचरसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) द्वारे एका बॅंकेतून दुस-या बॅंकेत तात्काळ पैसे ट्रान्सफर करता येणं शक्य होणार आहे. ज्याप्रमाणे इंस्टंट मेसेज डिलीव्हर होतात त्याचप्रमाणे दोन खाताधारकांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतील असं सांगितलं जात आहे. व्हॉट्सअॅपच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप पेमेंट आणि प्रायव्सही पॉलीसी स्विकारण गरजेचं असणार आहे.
वीचॅट आणि हाईक मेसेजिंग यासारखे अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसला सपोर्ट करतात. परंतू जर व्हॉट्सअॅपने ही सेवा सुरू केली तर याचा सर्वात जास्त फायदा व्हॉट्सअॅपलाच होणार आहे. कारण व्हॉट्सअॅप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि 20 कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत.यापूर्वी व्हॉट्सअॅपने जून महिन्यात इंस्टंट पेमेंट सर्विस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारखी वित्तीय संस्थांशी बोलणी केलयाचं वृत्त आलं होतं.
2016 मध्ये आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआय सर्विसची सुरूवात केली होती. यामुळे मोबाइल युझर्स या पद्धतीचा वापर करुन दोन बँका दरम्यान निधी ट्रांसफर करू शकतो.