साडंडबॉट कंपनीने भारतीय बाजारपेठेत एसबी ५७१ प्रो हा पोर्टेबल वायरलेस स्पीकर सादर केला असून यात सराऊंड साऊंड या प्रकारातील ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे.
भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वायरलेस स्पीकर लाँच करण्यात येत आहेत. यामुळे विविध उत्पादकांनी ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी यात नवनवीन फिचर्सचा समावेश करण्याला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमिवर, साऊंडबॉट कंपनीच्या एसबी ५७१ प्रो या मॉडेलमध्ये सराऊंड साऊंड या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यातील दोन स्पीकर हे मास्टर/स्लाव्ह या प्रकारानुसार एकमेकांना कनेक्ट करण्यात आले आहे. याच्या जोडीला यात क्वॉडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे दोन्ही स्पीकर एकाच वेळी एकमेकांना जोडलेले असतांना ते स्मार्टफोनशीही जोडलेले असतात. यामुळे यातून सराऊंड साऊंड या ध्वनीची अनुभूती घेता येते. या दोन्ही स्पीकर्सची क्षमता प्रत्येकी ५ वॅटची असून यातून एकत्रीतपणे १० वॅट क्षमतेच्या ध्वनीचे आऊटपुट मिळत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
साऊंडबॉटच्या हा पोर्टेबल स्पीकर स्मार्ट इंट्युटीव्ह कॉन्फीग्युरेशन या तंत्रज्ञानाने सज्ज आहे. याच्या मदतीने हा स्पीकर कोणत्याही स्मार्ट उपकरणाला ३ सेकंदाचा आत कनेक्ट करता येतो. तसेच याच्या मदतीने याला अन्य स्पीकर्सही संलग्न करता येतात. यात ब्ल्यु-टुथच्या मदतीने तब्बल ३३ फुटांपर्यंतच्या अंतरावर असणार्या स्मार्टफोनादी अन्य उपकरणांना कनेक्ट करता येते. यात २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यावर १० तासांपर्यंतचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा पोर्टेबल स्पीकर वॉटरप्रूफ आणि शॉकप्रूफ असल्याने तो कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येतो. हे मॉडेल ग्राहकांना ६,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले असून ते विविध शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे.