दक्षिण कोरियातील एका इंडस्ट्रियल डिझायनरने रस्त्यावर चालताना देखील मोबाईलमध्ये बघणाऱ्या ‘स्मार्टफोन झॉम्बीज’साठी एक शोध लावला आहे, जो त्यांना भिंत किंवा इतर अडथळ्यांवर धडकू देत नाही.
आठवीस वर्षीय पँग मिन-वूकने रोबोटिक डोळ्याची निर्मिती केली आहे ज्याला त्याने "The Third Eye", असे नाव दिले आहे. हा डोळा कपाळावर लावून तुम्ही कोणतीही भीती न बाळगता रस्त्यावरून मोबाईलमध्ये बघत चालू शकता.
पँग एका प्रकल्पावर काम करत आहे, ज्याचे नाव 'फोनो सेपियन्स’ आहे. या प्रकल्पासाठी त्याने एका कृत्रिम डोळ्याची निर्मिती केली आहे, जो तुम्ही तुमच्या कपाळावर लावू शकता. मोबाईलमध्ये बघण्यासाठी मान वाकवल्यावर या डोळ्याला सेन्सर्सद्वारे त्याची माहिती मिळेल. जेव्हा एक ते दोन मीटरच्या परिसरात एखादा अडथळा येईल तेव्हा आवाज करून हा डिवाइस धोक्याचा इशारा देईल.
“आपण आपले डोळे स्मार्टफोनवरून हटवत नाही, त्यामुळे आपल्याला अजून एका डोळ्याची गरज आहे. हे माणसाचे भविष्य आहे,” असे पँगने रॉयटर्सला सांगितले. या तिसऱ्या डोळ्यासोबत एका अॅपची निर्मिती करण्याची पँगची योजना आहे. परंतु, हा डिवाइस व्यवसायिकरित्या जगासमोर आणण्याचा विचार त्यांनी केला नाही.