मुंबई: इंटरनेटचा वेग कमी असल्यानं मनस्ताप सहन करावा लागल्याचा अनुभव अनेकांना अनेकदा आला असेल. इंटरनेटचा वेग जरा बरा असेल, तर बरीच कामं पटापट होतील, असा विचार अनेकांच्या मनात येतो. इंटरनेट सुपरफास्ट वेगानं सुस्साट चालावं, अशी अनेकांची इच्छा असते. अशा सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी सर्वात वेगवान इंटरनेटचा नवा विक्रम नोंदवला आहे. या इंटरनेटचा वेग १७८ टेराबाईट्स (टीबीपीएस) प्रति सेकंद इतका आहे.भारतातील इंटरनेट किमान वेग २ एमबीपीएस इतका आहे. यावरून युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी नोंदवलेल्या सर्वात वेगवान इंटरनेटचा अंदाज बांधता येऊ शकेल. रॉयल ऍकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग, एक्सटेरा आणि किड्डी रिचर्सच्या डॉ. लिडिया गाल्डिनो यांनी इंटरनेट वेग मोजणारा प्रकल्प हाती घेतला होता. याआधी सर्वाधिक इंटरनेट वेगाची नोंद ऑस्ट्रेलियात करण्यात आली होती. त्या इंटरनेटचा वेग ४४.२ टीबीपीएस इतका होता. मात्र आता नोंदवण्यात आलेला वेग त्याच्या चारपट आहे.इंटरनेटचा १७८ टीबीपीएस वेग थक्क करणारा आहे. या वेगात नेटफ्लिक्सवरील सर्वच्या सर्व कंटेट अवघ्या एका सेकंदात डाऊनलोड केला जाऊ शकतो. इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी जास्त क्षमतेच्या वेव्हलेंथचा वापर केला. सर्वसामान्यपणे इंटरनेटसाठी फायबर ऑप्टिक केबल्सचा वापर होतो. याशिवाय संशोधकांनी नव्या ऍम्प्लिफाईड तंत्रज्ञानाचाही वापर केला. सध्याच्या पायभूत सुविधांमध्ये ४.५ टेराहर्ट्झची बँडविड्थ वापरली जाते. नवी ९ टेराहर्ट्झची बँडविड्थ काही मोजक्याच ठिकाणी वापरली जात आहे. मात्र हे सुपरफास्ट इंटरनेट १६.८ टेराहर्ट्झची बँडविड्थ वापरतं. त्यामुळे इंटरनेटचा वेग १२८ टेराहर्ट्झवर पोहोचतो. या सगळ्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल, असं अनेकांना वाटू शकेल. मात्र युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार ऍम्प्लिफायरचा वापर करण्यासाठी येणारा खर्च फायबर ऑप्टिक्स केबलसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा कमी आहे.इंटरनेटचा १७८ टीबीपीएस वेग जबरदस्त आहे. मात्र सध्याच्या घडीला यावर केवळ प्रयोग सुरू आहेत. हे तंत्रज्ञान व्यवसायिक तत्त्वावर लवकर उपलब्ध होणार नाही. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.
सुस्साट! जगातील सुपरफास्ट इंटरनेटचा विक्रम; नेटफ्लिक्सवरील सर्वकाही एका सेकंदात डाऊनलोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:09 AM