रिलायन्सने सप्टेंबर २०१६ मध्ये टेलकॉम क्षेत्रात प्रवेश केला. प्रारंभी चक्क चकटफू वेगवान फोर-जी व्हिओ-एलटीई सेवेची घोषणा करून जिओने अन्य कंपन्यांना धडकी भरवली. तर नंतर जिओफोनच्या माध्यमातून हँडसेटच्या बाजारपेठेतही दबदबा प्रस्थापित केला. आता जिओने ऑप्टीक फायबरच्या मदतीने पुरविण्यात येणार्या ब्रॉडबँड सेवेवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या मे महिन्यात याचा प्रिव्ह्यू सादर करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत दिल्ली आणि मुंबईतल्या निवडक युजर्सला ही अतिगतीमान सेवा वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान, ताज्या लीकनुसार येत्या काही महिन्यांमध्ये जिओफायबर सेवा लाँच होऊ शकते. यात ग्राहकांना ऑप्टीकल फायबरच्या मदतीने ब्रॉडबँड इंटरनेटची सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १०० मेगाबाईट प्रति-सेकंद इतका वेग असेल असे कंपनीने जाहीर केले आहे.
रिलायन्स जिओफायबरमध्ये ग्राहकांना वर नमूद केल्यानुसार १०० एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. याच्या सोबत ग्राहक आपला स्मार्टफोन अथवा जिओ टिव्ही अॅपवरून अमर्याद कॉल्स करू शकणार आहे. केंद्र सरकारने मे महिन्याच्या प्रारंभीच इंटरनेट टेलीफोनीला मान्यता दिली आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर जिओफायबरचे ग्राहक करू शकणार आहेत. यामुळे अतिगतीमान इंटरनेटसह अमर्याद कॉलींगची सुविधादेखील ग्राहकाला मिळणार आहे. याची आकारणी कशी करण्यात येईल याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. तथापि, या सर्व सेवा युजरला एक हजार रूपया प्रति-महिन्याच्या आतच याची आकारणी असेल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. अर्थात जिओ ब्रॉडबँडच्या सेवेत जोरदार पदार्पण करणार असल्याचे मानले जात आहे.