अनिल भापकर
विंडोज एक्सपी नंतर मायक्रोसॉफ्टची सर्वाधिक लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजेच विंडोज ७ हि होय. जुलै २००९ मध्ये Windows 7 हि ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टने बाजारात आणली होती. त्यापूर्वी २००७ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज व्हिस्टा ही ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली होती. विंडोज व्हिस्टामधील काही त्रुटी दुरुस्त करून मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ हि एक परिपूर्ण ऑपरेटिंग सिस्टिम जुलै २००९ मध्ये लाँच केली होती. आता मात्र पुढील वर्षापासून विंडोज ७ या ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली आहे. पुढील वर्षी १४ जानेवारी २०२० पासून विंडोज ७ ला सपोर्ट करणे मायक्रोसॉफ्टकडून बंद करण्यात येणार आहे.
विंडोज ७ रिटायर होतेय म्हणजे नेमकं काय ?
एखादी ऑपरेटिंग सिस्टिम रिटायर होतेय याचा अर्थ म्हणजे ती ऑपरेटिंग सिस्टिम असलेले कॉम्पुटर किंवा लॅपटॉप लगेच बंद पडतील असे नव्हे तर त्या संबंधित दिवसापासून त्या ऑपरेटिंग सिस्टिमचे कोणतेही सिक्युरिटी अपडेट या पुढे मिळणार नाही. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस याचा समावेश असतो . म्हणजेच १४ जानेवारी २०२० पासून विंडोज ७ या ऑपरेटिंग सिस्टिमचे कुठलेही अपडेट्स मायक्रोसॉफ्टकडून मोफत उपलब्ध होणार नाही. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ साठीचा अधिकृत फोरम सपोर्ट बंद केले होते. विंडोज ७ नंतर विंडोज ८ आले त्यानंतर ८.१ आणि आता जुलै २०१५ मध्ये कंपनीनं विंडोज १० आणले आहे.त्यामुळे मायक्रोसॉफ्टने युझर्सला आता विंडोज १० ला अपग्रेड व्हा असे नोटिफिकेशन्स पाठवायला सुरुवात देखील केली आहे. यापूर्वीच मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा चा सपोर्ट बंद केलेला आहे.
विंडोज ७ प्रोफेशनल आणि विंडोज ७ इंटरप्रायजेस साठी ही सुविधा सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला विंडोज ७ एक्सटेंडेड सिक्युरिटी अपडेट्स साठी पैसे मोजावे लागतील. या एक्सटेंडेड सिक्युरिटी अपडेट्स चा सपोर्ट जानेवारी २०२३ पर्यंत असेल असे मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे.
anil.bhapkar@lokmat.com