नवी दिल्ली - सध्या डिजिटल व्यवहारांमुळे स्मार्टफोन काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक बनले आहे. कारण, अज्ञातांकडून किंवा कंपनीच्या नावे फोन करुन तुमची फसवणूक होऊ शकते. नुकतेच, काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका नागरिकाला असाच गंडा घालण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने आपला मोबाईल बंद करताच, त्याच्या बँक अकाऊंटमधून 93 हजार रुपये काढण्यात आले होते. त्यामुळे अशा सूचनांचे पालन करण्यापूर्वी तुम्ही सावधान असणे गरजेचं आहे.
हॅकर्सकडून टेलिकॉम कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन तुमची फसवणूक करण्यात येत आहे. कॉल ड्रॉपिंगची समस्या आणि इंटरनेट स्पीडच्या तक्रारीबद्दल विचारणा करुन चलाखीने त्यांना हवी ती माहिती तुमच्याकडून काढून घेतात. तुमच्या सीमकार्डचा वीस अंकी नंबर मिळवून त्यानंतर तुम्हाला 1 अंक दाबायला सांगतात. त्यानंतर तुमचे ऑथेन्टिकेशन समोरच्या व्यक्तीला मिळते. त्यामुळे तुम्हाला येणारे सर्व मेसेज हॅकर्सच्या मोबाईलवर पोहोचतात.
हॅकर्संना तुमच्या मोबाईलमधील सीम स्वॅपिंगसाठी 4 तासांचा कालावधी लागतो. म्हणून हॅकर्सकडून सातत्याने फोन करुन तुम्हाला त्रास देऊन माहिती विचारण्यात येते. त्यामुळे तुम्ही त्रस्त होऊन फोन बंद करता आणि हॅकर्स सहजपणे त्यांचा डाव साधतात. त्यामुळे हॅकर्सच्या सूचनेनंतर कधीही फोन बंद करु नका.