टॅग या भारतीय कंपनीने सोनिक अँगल १ हा वायरलेस स्पीकर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याला ऑनलाईन पध्दतीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. टॅगच्या सोनिक अँगल १ या स्पीकरचे मूल्य २,४९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल कंपनीच्या ई-स्टोअरसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या तरी याच्या ऑफलाईन उपलब्धतेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, लवकरच याला देशभरातील शॉपिजमधूनही सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.
स्पीकर ब्ल्यु-टूथच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येतो. मात्र यासोबत यामध्ये ऑक्झ-इन पोर्टदेखील देण्यात आले आहे. यामुळे याचा वायरयुक्त स्पीकर म्हणूनही वापर करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये अतिशय दर्जेदार बास इफेक्ट प्रदान करण्याची प्रणाली देण्यात आलेली आहे. यातील बॅटरी ही २,२०० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे सात तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याची डिझाईन ही अतिशय आकर्षक अशी आहे. तर याचे वजन फक्त ३५५ ग्रॅम इतके असल्यामुळे याला कुठेही अगदी सहजपणे नेता येते. अर्थात याचा पोर्टेबल स्पीकर म्हणून वापर करता येणारे आहे. यात दोन स्पीकर्सचा समावेश असून यांच्या मदतीने सुश्राव्य ध्वनीचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
टॅग सोनिक अँगल १ हा स्पीकर आयपीएक्स-५ या मानकाच्या निकषांनुसार उत्पादीत करण्यात आला आहे. अर्थात हे मॉडेल वॉटरप्रूफ आहे. यामुळे याला अगदी भर पावसातही वापरणे शक्य आहे. अलीकडच्या काळात काही स्मार्ट स्पीकरमध्ये डिजिटल व्हर्च्युअल असिस्टंटचा वापर केलेला असतो. या अनुषंगाने यात गुगल असिस्टंट आणि अॅपलचा सिरी या दोन्ही डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे गुगल असिस्टंट अथवा सिरीला कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांड देऊन संगीत ऐकण्यासह विविध फंक्शन्सचा वापर करू शकतात. या स्पीकरमध्ये गुगल होम अथवा अॅपलच्या होमपॅडइतक्या सर्व सुविधा नसल्या तरी एंट्री लेव्हलचा स्मार्ट स्पीकर म्हणून याचा वापर करता येणार आहे.