नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या गीगाफायबरच्या आधीच देशाला डीटीएच सुविधेने व्यापलेली कंपनी टाटा स्काय ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा देणार आहे. प्रारंभी देशातील महत्वाच्या 12 शहरांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरविणार आहे. या कंपनीचे प्लॅन्स एक, तीन, पाच, नऊ ते 12 महिन्यांच्या मुदतीचे आहेत. मात्र, किंमतीच्या बाबतीत जिओच्या गीगाफायबरला ही कंपनी टक्कर देऊ शकेल असे त्यांच्या किंमतीवरून दिसत नाहीय.
टाटा स्काय त्यांच्या उत्तम क्वालिटीच्या डीटीएच सेवेसाठी नावाजले जाते. ही कंपनीची नवी दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, जाझियाबाद, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, मिरा-भाईंदर, भोपाळ, चेन्नई आणि बंगळुरु या शहरांमध्ये ब्रॉडबँड सेवा आहे.
एक महिन्याच्या अनलिमिटेड इंटरनेट प्लॅनसाठी 999 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये 5 एमबीपीएस एवढा वेग मिळणार आहे. तसेच 10, 30, 50 एमबीपीएसचे प्लॅनही उपलब्ध आहेत. यांचे दर अनुक्रमे 1500, 1800 आणि 2500 रुपये आहेत.
याशिवाय पाच महिन्यांच्या प्लॅनमध्ये 4995 रुपयांमध्ये एक महिन्याची इंटरनेट सुविधा मोफत तर 9 महिन्यांच्या प्लॅनमध्ये 8991 रुपयांमध्ये दोन महिने मोफत देण्यात येणार आहे.