रेल्वे हे देशातील सर्वात सोयीचे आणि प्रमुख वाहतुकीचे साधन आहे. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात, परंतु सणासुदीच्या काळात रेल्वेतील प्रवाशांची संख्या आणखी वाढते. आणि सोयीची सीट मिळाली नाही तर सोबत असलेल्या महिला किंवा ज्येष्ठ प्रवाशांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी दिलेली माहिती शेवट्पर्यंत वाचा. जेणेकरून तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकासाठी तरी तुम्ही निश्चितपाणी खालची सीट कशी मिळवू शकाल!
ट्रेन तिकीट आरक्षणासंबंधी माहिती :
ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट काढणे तेही सण-उत्सवाच्या काळात, हे कठीण काम असते. अशा परिस्थितीत लोअर बर्थ मिळणे खूप कठीण आहे. पण ट्रेनचे तिकीट बुक करताना काही नियम लक्षात ठेवले तर निदान ज्येष्ठांसाठी तरी लोअर बर्थ मिळण्याची शक्यता पूर्वीपेक्षा अधिक वाढेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे स्वतः ही माहिती वेळोवेळी शेअर करत असते, जेणेकरून लोकांना प्रत्येक ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळेल. सदर माहिती देखील रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तिचा योग्य वापर कसा करायचा ते पाहू.
ट्रेनमध्ये लोअर बर्थ कसा मिळवायचा :
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठी 'लोअर सीट' साठी राखीव जागांचा कोटा फक्त ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना लागू आहे. ऑनलाइन बुकिंग करताना तसेच तिकीट विंडोवर जाऊन आरक्षण फॉर्म भरताना ज्येष्ठ लोकांसाठी हा पर्याय दिलेला असतो. तो आठवणीने निवडावा. जेव्हा ती व्यक्ती एकटी असेल किंवा जास्तीत जास्त दोन लोक प्रवास करत असतील अशा स्थितीत हे आरक्षण लागू होते.
जर दोनपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक एकत्र प्रवास करत असतील किंवा कुटुंबियांसोबत प्रवास करत असतील तेव्हा हे आरक्षण मिळत नाही. अशा वेळी कन्फर्म सीट असेल तर ऑन ड्युटी असणारे टीसी रिकामी लोअर सीट असेल तर अप्पर सीट मिळालेल्या ज्येष्ठ व्यक्तीला लोअर सीट मिळवून देऊ शकतात. मात्र सण उत्सवाच्या दिवसात रिकाम्या सीट मिळणे अवघड असल्याने ज्येष्ठांसाठी लोअर सीटचे आरक्षण स्वतंत्रपणे करून घ्यावे आणि नंतर इतरांचे आरक्षण करावे. तसे केल्याने लोअर सीट मिळण्याची शक्यता बळावते.