नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मेसेज, फोटो, व्हिडीओ. डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी युजर्स फोनचा वापर करतात. मात्र अनेकदा जास्त एमबीची फाईल शेअर केली तर मोबाईल डेटा लवकर संपतो. मात्र इंटरनेटशिवाय देखील आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत अथवा नातेवाईकांसोबत डेटा शेअर करू शकतो. यासाठी काही अॅप्सची मदत घ्यावी लागते. अशाच काही अॅप्सविषयी जाणून घेऊया.
शेअरइट
शेअरइट हे अत्यंत लोकप्रिय अॅप असून अनेक जण त्याचा वापर करतात. जगभरात 200 पेक्षा जास्त देशांमध्ये 500 मिलियनहून जास्त लोक या अॅपचा वापर करतात. यूएसबीचा वापर न करता, डेटा न खर्च करता या अॅपच्या मदतीने व्हिडीओ, गाणी, फोटो ट्रान्सफर करता येतात. हे अॅप अँड्रॉईड, आयओएस (आयफोन/आयपॅड), विंडोज फोन, विंडोज आणि मॅकला सपोर्ट करतं. तसेच याचा वापर करणं देखील खूप सोपं आहे.
झाप्या
जगभरात 45 कोटींपेक्षा जास्त लोक झाप्या अॅपचा वापर करतात. या अॅपच्या मदतीने अँड्रॉईड, आयफोन, आयपॅड, विंडोज, टायज़ेन, पीसी आणि मॅक सिस्टमवर इंस्टंट शेअरिंग करता येतं. तसेच डेटा खर्च न करता वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सचा आनंदही घेता येतो. या अॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, अॅप शेअर करता येतात.
जेंडर
फाईल शेअरिंगसाठी जेंडर उत्तम अॅप आहे. शेअरइटप्रमाणेच हे अॅप देखील काम करतं. अॅपसाठी यूएसबी कनेक्शन किंवा पीसी सॉफ्टवेअरच गरज नाही. डेटाचा बॅकअप घेऊन हे अॅप एका फाईल मॅनेजरप्रमाणे काम करतं. हे अॅप इंग्लिश, बंगाली, चीनी, हिंदी, फ्रेंच, थाय भाषेसारख्या अन्य भाषांमध्येही सपोर्ट करतं.
4 शेयर अॅप्स
4 शेयर अॅप्स हे केवळ अँड्रॉईड डिव्हाईससाठी सपोर्ट करतं. या अॅपच्या मदतीने व्हिडीओ, फोटो, गाणी, अॅप आणि फाईल्स शेअर करता येतात. अँड्रॉईडवर या अॅपला 4.3 रेटिंग मिळालं आहे. तसेच 4 शेयर अॅप्स इंग्रजी, स्पॅनिश, थाय, इटॅलियन सारख्या 31 भाषांमध्ये सपोर्ट करतं.
सुपरबीम
सुपरबीम हे देखीव एक लोकप्रिय अॅप आहे. मोठ्या फाईल्स शेअर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अनेक जण या अॅपचा वापर करतात. या अॅपच्या माध्यमातून रिसीव्ह केलेल्या सर्व फाईल्स या '/sdcard/SuperBeam' मध्ये डिफॉल्ट स्टोर होत आहे. सेटिंगमध्ये जाऊन ते नंतर बदलता येईल.