टेक्नो मोबाइल या कंपनीने एआय सेल्फी कॅमेर्याने सज्ज असणारा कॅमॉन आय क्लिक हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. टेक्नो मोबाइल या कंपनीने अलीकडेच कॅमॉन आय स्काय हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला होता. यानंतर याच मालिकेत आय क्लिक हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात अतिशय दर्जेदार कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष करून यातील फ्रंट कॅमेर्यावर कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे. हा फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सल्सचा असून यात ऑटो-फोकस आणि ड्युअल एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स या तंत्रज्ञानावर आधारित काही फिचर्स आहेत. यामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित ‘ब्युटी मोड’ दिलेला असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार सेल्फी प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला ‘एआय ऑटो सीन डिटेक्शन’, पॅनोरामा मोड, एआय बोके इफेक्ट आदी अन्य फिचर्सची जोडदेखील देण्यात आली आहे. तर यातील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशने सज्ज असून तो १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात फेस अनलॉक हे फिचरदेखील देण्यात आले आहे.
टेक्नो कॅमॉन आय क्लिक या मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या हेलीओ पी २३ या प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ ८.१ या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या हाय ओएस ३.३.० या प्रणालीवर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३,७५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीत १३,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. यासोबत व्होडाफोनने २२०० रूपयांचा कॅशबॅक देऊ केला आहे. तसेच ‘व्होडाफोन प्ले’ची ग्राहकाला तीन महिन्यापर्यंत सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. याच्या जोडीला कंपनीने ग्राहकाला खरेदी केल्यापासून १०० दिवसांपर्यंत रिप्लेसमेंट वॉरंटी, १-टाईम रिप्लेसमेंट वॉरंटी तर १-महिन्याची एक्सटेंडेड वॉरंटीदेखील देण्याचे जाहीर केले आहे.