नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने (TRAI) त्रासदायक कॉल आणि एसएमएसचा धोका थांबवण्यासाठी एक नवीन नियम बनवला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सेवा प्रदात्यांना कॉल आणि मेसेजसाठी ग्राहकांची संमती मिळवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आणि रद्द करण्यासाठी दोन महिन्यांच्या आत एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात केवळ ग्राहक प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस प्राप्त करण्यासाठी आपली संमती नोंदवू शकतील, असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आता सर्व अॅक्सेस पुरवठादारांना डिजिटल सहमती अधिग्रहण (DCA) विकसित आणि तैनात करण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, सध्या प्रमोशनल मेसेज प्राप्त करण्यासाठी ग्राहकांची संमती दर्शविणारी कोणतीही एकीकृत प्रणाली नाही आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्व अॅक्सेस पुरवठादारांना अशा सुविधा विकसित करण्यासाठी आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आपल्या टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन, 2018 अंतर्गत हे निर्देश जारी केले आहेत.
आता ग्राहकांची परवानगी घ्यावी लागणार!डीसीए प्रक्रियेमध्ये TCCCP विनियम 2018 अंतर्गत ग्राहकांची संमती प्राप्त करणे, राखून ठेवणे आणि रद्द करण्याची सुविधा असणार आहे. संकलित केलेला संमती डेटा सर्व अॅक्सेस प्रदात्यांद्वारे स्क्रबिंगसाठी डिजिटल लेजर प्लॅटफॉर्मवर (DLT) शेअर केले जाईल.
प्रमोशन कॉलची असेल वेगळी ओळखरिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया यासारख्या दूरसंचार ऑपरेटरना संमती मागणारे मेसेज पाठवण्यासाठी 127 ने सुरू होणारा कॉमन शॉर्ट कोड वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. जिओ, एअरटेल, बीएसएनएल सारख्या दूरसंचार कंपन्यांना बँकिंग, मार्केटिंगसाठी स्वतंत्र क्रमांक जारी केले जातील. यामुळे यूजर्स बँकिंग आणि प्रमोशनल कॉल्स आणि कॉल्स सहज ओळखू शकतील.