Telegram कडे WhatsApp चा पर्याय म्हणून बघितले जाते. आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी टेलिग्रामने महामारीच्या काळात व्हिडीओ कॉलिंगची सुरुवात केली होती. आता टेलिग्रामने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सना टक्कर देण्यासाठी कंबर बांधली आहे. कंपनीने ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर उपलब्ध केले आहे, इतकेच नव्हे तर यात स्क्रीन शेयरिंगचे फिचर देखील देण्यात आले आहे. हा अपडेट मोबाईल, डेस्कटॉप आणि टॅबलेट अॅप्सवर उपलब्ध झाला आहे.
युजर्स आता एखाद्या ग्रुप व्हॉइस कॉलला ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये फक्त एका क्लिकने रूपांतरित करू शकतात. यासाठी फक्त कॅमेरा आयकॉनवर टॅप करावे लागेल. ग्रुप व्हॉइस कॉल्समध्ये सहभागी होणाऱ्या युजर्सना कोणतीही मर्यादा नाही. परंतु फक्त 30 युजर्सना ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होता येईल. लवकरच ही मर्यादा वाढविण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
ग्रुप अॅडमिन्स एखाद्या युजरची व्हिडीओ फीड ग्रुपमध्ये पिन करून ठेऊ शकतात. हे फिचर मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीसाठी उपलब्ध झाले आहे. युजर इतर युजर्सच्या स्क्रीनवर क्लिक करून ती मोठी करू शकतात.
टेलिग्रामने या फिचरमध्ये शेयर स्क्रीनची भर टाकली आहे. युजर तीन डॉट मेनूवर क्लिक करून आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबवरून स्क्रीन शेयरिंग सुरु करू शकतात. डेस्कटॉपवर स्क्रीन शेयर करत असलेल्या युजरची स्क्रीन पिन होते. या फिचरमुळे टेलिग्रामचा ग्रुप व्हिडीओ कॉलिंग अनुभव झूम आणि गुगल मीट सारखा वाटतो.