कोका कोला हे नाव कोणाला माहिती नाही असे होणार नाही. औषध बनवित असताना त्यांना कोल्ड्रिंकचा शोध लागला होता. या कंपनीने अख्ख्या जगभराला येड लावले आहे. शोधायला गेले एक हाती लागले भलतेच अशी या कंपनीची सुरुवात असताना आता तिसऱ्याच क्षेत्रात ही कंपनी एन्ट्री करणार असल्याचे वृत्त आहे.
अमेरिकन बेव्हरेज जायंट - कोका-कोला लवकरच स्मार्टफोन बाजारात उतरणार आहे. अलीकडेच, कोका-कोलाच्या स्मार्टफोनचा पहिला फोटो समोर आला आहे. टिपस्टर मुकुल शर्माने शेअर केलेल्या ताज्या माहितीनुसार, कोला फोन लवकरच भारतीय बाजारपेठेत पदार्पण करेल. कोकाकोला स्वत: फोन बनविणार नाहीय, तर तो दुसऱ्या स्मार्टफोन कंपनीकडून तो बनवून घेणार आहे. ही कंपनी रिअलमी किंवा रेडमी असू शकते.
टिपस्टरने आगामी कोला फोनचे डिझाइन रेंडर देखील शेअर केले आहे. यानुसार तो लाल रंगातही येईल. मोठ्या फॉन्टमध्ये कोका-कोला ब्रँडिंग असेल. कोला फोन या तिमाहीत पदार्पण करेल असाही टिपस्टरचा दावा आहे. कोला फोन, किंवा कंपनी जे काही नाव देईल तो पाठीमागून ड्युअल-रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश वाला असेल. कोला फोनवरील व्हॉल्यूम रॉकर्स उजव्या बाजुला असतील असे दिसत आहे.
कोला फोनचे रेंडर, रंग वगळता, Realme 10 शी तंतोतंत जुळतो. कोका-कोलाने आपल्या पहिल्या स्मार्टफोनसाठी चीनी उत्पादक Realme सोबत सहयोग केल्याची शक्यता आहे. कदाचित कोकाकोला पहिला फोन Realme 10 लाच रीब्रँड करेल किंवा काही बदल देखील करण्याची शक्यता आहे.