आपल्या मृत्यूनंतर सोशल मीडिया अकाउंटचं काय होतं, त्या अकाउंटवर आपला काही अधिकार उरतो का, याबद्दलची माहिती आपण मागच्या लेखात वाचली, पण आपल्या सोशल मीडिया अकाउंटचं मृत्युपत्र आपल्याला करायचं असेल, त्यावर आपला अधिकार हवा असेल किंवा त्या अकाउंटवर जो काही ‘ऐवज’ ठेवलेला आहे, त्याचा अधिकार आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या व्यक्तीला द्यायचा असेल, तर काय करायचं?..
या जगात केवळ दोनच गोष्टी शाश्वत आहेत, त्या म्हणजे मृत्यू आणि इंटरनेट असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याबाबत आपण अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे.
१- मुळात सोशल अकाउंट्सवर आपली जी काही महत्त्वाची माहिती असेल, ती आधीच डाऊनलोड करून ठेवणं हा पहिला आणि सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या अपरोक्ष कुणा तिसऱ्या पार्टीच्या नाकदुऱ्या आपल्याला काढायला लागू नयेत.
२- ट्विटर, फेसबुक, यूट्यूब यासारख्या सोशल मीडिया साइट्सवर असलेला आपला डाटा डाऊनलोड करून घेण्यासाठी या साइट्स काही टूल्स आपल्याला देतात, त्यांचा वापर करून वेळोवेळी आपण आपला डाटा सेव्ह करून ठेवला पाहिजे. तशी नियमित सवयच आपण स्वत:ला लावून घ्यायला हवी.
३- आपल्या मृत्यूनंतर आपल्या खात्याचे व्यवस्थापन जर आपल्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे सोपवायचे असेल, तर त्यासाठी फेसबुकसारख्या काही साइट्सवर ‘लिगसी कॉण्टॅक्ट्स’ सारखे काही पर्याय उपलब्ध आहेत. आपले खाते सक्रिय ठेवायचे, बंद करायचे की त्याचे ‘स्मारक’ करायचे याचा निर्णय त्या व्यक्तीला घेता येईल.
४- तुमचा डिजिटल वारसा तुम्हाला नीट सांभाळायचा असेल तर एखाद्या हार्ड ड्राइव्हवर तो ‘सील’ करून ठेवता येईल किंवा ‘क्लाउड ड्राइव्ह’वर तो पासवर्ड प्रोटेक्टेड करूनही ठेवता येईल.
५- बँकेला किंवा कंपनीला एखाद्याचं डेथ सर्टिफिकेट सादर केल्यास काही अधिकार त्याच्या कुटुंबीयांना मिळतात, त्याचप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटचे काही अधिकार त्याच्या नातेवाइकांना मिळू शकतात.
६- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मृत्यूनंतरही आपले फोटो, व्हिडीओज वापरण्याचा अधिकार त्या त्या सोशल मीडिया साइट्सकडे असतो. त्यामुळे त्याबाबत आधीच तजवीज केलेली केव्हाही उत्तम!