मायक्रो ब्लॉगिंग साईट Twitterचा ताबा घेतल्यानंत Elon Musk मोठ-मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. त्यानंतर आता त्यांनी कर्मचाऱ्यांना पहिला ईमेल पाठवला आहे. बुधवारी रात्री उशिरा पाठवलेल्या या ईमेलमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना आगामी काळात कठीण परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले.
ब्लूमबर्ग न्यूजनुसार, इलॉन मस्क यांनी त्यांच्या ईमेलमध्ये म्हटले की, 'माझे म्हणणे शुगरकोट करण्यात काहीच अर्थ नाही. जाहिरातींवर अवलंबून असलेल्या ट्विटरसारख्या कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि याचा काय परिणाम होऊ शकतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता तुम्हाला ऑफीसमध्ये येऊन काम करावं लागेल. रिमोटवर काम करणे आता शक्य नाही. आठवड्यातून किमान 40 तास ऑफीसमध्ये येऊन काम करावेच लागेल.
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते अनेक धक्कादायक निर्णय घेत आहेत. इलॉन मस्क यांनी जगभरातील ट्विटरच्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे 7,500 लोकांचा रोजगार गेला आहे. भारतात इलॉन मस्कने ट्विटर इंडियाच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले आहे. मस्क येताच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक बड्या लोकांचीही हकालपट्टी केली. इतकंच नाही तर इलॉन मस्कने यूजर्सच्या बाबतीतही अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत.