नवी दिल्ली - भारत सरकारने व्हॉट्सअॅपला नोटीस बजावल्यानंतर व्हॉट्सअॅपने ठोस पाऊल उचलले आहे. व्हॉट्सअॅपद्वारे सातत्याने शेअर होत असलेल्या फेक न्यूज आणि मॉब लिंचिंगच्या (जमावाकडून होणाऱ्या हत्या) घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने नवीन फिचरचे टेस्टींग सुरू केले आहे. हे फिचर सुरू झाल्यानंतर तुम्हास बहुतांश ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करु शकणार नाहीत. म्हणजेच व्हॉट्सअॅपकडून मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा आखण्यात येत आहे.
व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगवरुन यासंदर्भात माहिती दिली. भारतीय युजर्संसाठी लवकरच नवीन फिचर सुरु करत असल्याचे कंपनीने ब्लॉगमध्ये म्हटले आहे. या फिचरमुळे व्हिडिओ किंवा मेसेज ठराविक किंवा ठराविक ग्रुपमध्येच फॉरवर्ड करता येणार आहेत. तर भारतीय युजर्संना केवळ 5 ग्रुपमध्येच मेसेज फॉरवर्ड करता येणार आहे. त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅपवरुन फॉरवर्ड हा पर्याय नाहीसा होणार आहे. मात्र, इतर देशातील व्हॉट्सअॅप युजर्संना 20 ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करता येईल. सध्या भारतामध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाणात व्हॉट्सअॅपवरुन मेसेज आणि व्हिडिओ फॉरवर्ड केले जातात. दरम्यान, सरकारने 3 जुलै रोजी व्हॉट्सअॅपला नोटीस बजावली होती. त्यानंतर, पुन्हा एकदा सरकारने नोटीस जारी करत व्हॉट्सअॅपला कारवाई करण्याचा इशारा दिला होता.