अचानक बॅटरी संपून स्मार्टफोन बंद पडू नये म्हणून आपण पावरबँक घेतो. साधारणतः 5000mAh किंवा 10,000mAh ची पावरबँक पुरेशी असते. सध्या बाजारात 20,000mAh च्या पावरबँक्स देखील उपलब्ध आहेत ज्या लॅपटॉप देखील चार्ज करतात. परंतु एका चीन युट्युबरनं 27 मिलियन mAh ची अवाढव्य पावरबँक बनवली आहे.
Handy Geng नावाच्या एका चिनी युट्युबरनं ही पावरबँक बनवण्याच्या व्हिडीओ आपल्या चॅनलवर प्रकाशित केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तो आपली छोटी पावर बँक मित्रांना दाखवतो परंतु मित्रांकडे त्यापेक्षा मोठ्या पावरबँक्स असतात, अशी गंमत दाखवण्यात आली आहे. त्यांना ठेंगा दाखवण्यासाठी गेंग कामाला लागतो आणि 2,70,00,000mAh ची पावर बँक बनवून दाखवतो.
खरं तर ही एक इलेक्ट्रिक व्हेईकलची बॅटरी आहे, जिला पावर बँकचा लूक गेंगनं दिला आहे. ईव्हीचा बॅटरी पॅकला त्यानं सिल्वर मेटॅलिक केसिंगची सुरक्षा दिली आहे. एका इनपुटनं ही चार्ज करता येईल अशी सोय करण्यात आली आहे. तर सोबत 60 आउटपुट पोर्ट आहेत जे 220V ला सपोर्ट करतात. तुम्ही 20 डिवाइस एकाच वेळी चार्ज करू शकता. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपचा समावेश आहे.
फक्त छोटे डिवाइस नव्हे तर गेंगनं यावर टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इंडक्शन कुकर देखील चालवून दखवला आहे. मुळात हा 220V वोल्टेज रेटिंग असलेला ईव्ही बॅटरी पॅक असल्यामुळे टेक्निकली यावर एखादी इलेक्ट्रिक कार किंवा बाईक देखील चार्ज करता येईल. ही पावर बँक नेता यावी म्हणून गेंगनं हिला चाकं देखील जोडली आहेत.
हे देखील वाचा:
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...