ल्युसी ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तिचे इंस्टाग्रामवर ७८,००० फॉलोअर्स आहेत. रोझी हीसुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे इंस्टाग्रामवर १,३०,००० फॉलोअर्स आहेत. लिल मिकेला ही अजून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तिचे जवळजवळ ३ मिलियन म्हणजे तीस लाख सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत. लू ऑफ मगालूला ६० लाख सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत, तर एफ. एन. मेका या रॅपरला जवळजवळ १ कोटी टिकटॉक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया, त्यावरचे इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांचे फॉलोअर्स हे एक वेगळंच जग आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे सोशल मीडियावरील सेलिब्रिटी! हे इन्फ्लुएन्सर्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत टाकत असतात आणि तरुण पिढीतील मुलं त्यांना फॉलो करतात.
या इन्फ्लुएन्सर्सने कुठले कपडे घातले आहेत, कुठल्या ब्रॅण्डची कॉस्मेटिकस वापरली आहेत, कुठलं फूटवेअर, कुठल्या हॅण्डबॅग्ज, हेअरस्टाईल या सगळ्याकडे तरुण पिढीतील मुलं लक्ष ठेवून असतात आणि मग त्याप्रमाणे स्वतःचा लूक क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. त्यातही मग अर्थातच त्या इन्फ्लुएन्सरने घातलेल्या ब्रँडचे कपडे, फूटवेअर, हॅन्डबॅग्ज, गॉगल्स आणि इतर ॲक्सेसरीज त्यांना वापराव्याशा वाटतात. त्यासाठी ते त्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळेच या इन्फ्लुएन्सर्सना जाहिरात क्षेत्रात प्रचंड मागणी असते. कारण त्यांनी वापरलेल्या वस्तूंची जाहिरात थेट संभाव्य ग्राहकांपर्यंत होत असते आणि त्यांची संख्या लाखो, करोडोंमध्ये असते. त्यामुळेच मोठमोठे ब्रँड्स या माध्यमातून त्यांच्या वस्तूंची जाहिरात करत असतात.
ल्युसी. रोझी, लिल मिकेला, लू ऑफ मगालू आणि एफ. एन. मेका हे अशा अनेक इन्फ्लुएन्सरपैकी काही आहेत. पण त्यांच्यात आणि इतर इन्फ्लुएन्सर्समध्ये एक मूलभूत फरक आहे. सोशल मीडियावरील अनेक इन्फ्लुएन्सर्स या खऱ्या व्यक्ती असतात. पण ही ल्युसी, रोझी वगैरे मंडळी चक्क खोटी आहेत.
हे सगळे रोबोज आहेत का? तर तसं नाही. म्हणजे काही प्रमाणात रोबो आहेत. पण आपल्याला सामान्यतः रोबो म्हटल्यावर अडकत अडकत चालणारे किंवा मग थेट घर झाडणारे चकतीसारखे रोबो माहिती असतात, तसे हे रोबो नाहीत, तर या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेल्या डिजिटल व्यक्ती! साधारणपणे कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरचे गेम्स असतात, त्यात अनेक पात्रं असतात. ही पात्रं, ‘व्यक्ती’ ज्या तंत्रज्ञानानं बनवली जातात, त्याच तंत्रज्ञानाने या डिजिटल व्यक्ती बनवल्या जातात. त्या मुळात खोट्याच असल्याने त्यांना पाहिजे तसं रंगरूप आणि आवाज देता येतो. त्या व्यक्ती कशा वागतील, हेही व्यवस्थित डिझाईन केलेलं असतं. या व्यक्ती सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधतात आणि तोही इतका बेमालूम असतो, की आपण जिच्याशी बोलतोय ती व्यक्ती खोटी असेल, असा संशयसुद्धा कोणाला येत नाही. आणि समजा, एखाद्या फॉलोअरला हे समजलं, की आपण जिला फॉलो करतोय, ती व्यक्ती खरी नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारी आभासी व्यक्ती आहे, तर?
पुन्हा एकदा, जुन्या पिढीतल्या, म्हणजे साधारण तिशीच्या किंवा खरं तर पंचविशीच्या पुढच्या लोकांना ते कदाचित आवडणार नाही. स्वतःची फसवणूक झाल्यासारखं वाटेल. पण या इन्फ्लुएन्सर्सचे फॉलोअर्स त्याहून कमी वयाची म्हणजे तेरा ते पंचवीस वर्षांची तरुण मुलं असतात आणि त्यांना या कल्पनेत काही अनैतिक वाटत नाही. इंचियोनमध्ये राहणाऱ्या २३ वर्षांच्या ली ना क्योंगने दोन वर्षांपूर्वी रोझीला फॉलो करायला सुरुवात केली तेव्हा तिला वाटलं होतं, की रोझी ही खरी व्यक्ती आहे. त्यानंतर रोझीनेदेखील तिला फॉलो करायला सुरुवात केली. तिच्या पोस्टवर कॉमेंट्स करायला सुरुवात केली आणि त्या दोघींमध्ये एक व्हर्च्युअल / आभासी मैत्री निर्माण झाली. काही काळानंतर लीला समजलं, की रोझी ही खरी नसून आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर चालणारी डिजिटल व्यक्ती आहे. पण तरीही ली म्हणते, ‘आम्ही एकमेकींशी खऱ्या मैत्रिणींसारख्या बोलतो आणि शेअर करतो. त्यामुळे ती मला आभासी व्यक्ती वाटत नाही.
कविकल्पना प्रत्यक्षात!आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आत्ताआत्तापर्यंत कविकल्पना वाटणारी बाब आता प्रत्यक्षात आली आहे. यात कोणाला मानवतेला धोका दिसेल तर कोणाला भविष्यातील संधी. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की तरुण मुलांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून केव्हाच स्वीकारला आहे, तोही बहुतांश आनंदाने!