शॉर्ट व्हिडीओ अॅप टिकटॉक, 2020 मध्ये जगभरात सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आलेला अॅप बनला आहे. या शर्यतीत टिकटॉकने फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया दिग्गजांना मागे टाकले आहे. निक्केई आशियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, 2019 मध्ये सर्वात जास्त डाउनलोड केल्या जाणाऱ्या अॅप्सच्या यादीत टिकटॉक चौथ्या स्थानावर होता. परंतु 2020 मध्ये भारतासह अनेक देशांमध्ये बंदी असतानाही टिकटॉकने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 2020 मध्ये अमेरिकेत या अॅपची प्रसिद्धी सर्वाधिक वाढली आहे, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तर आशियात अजूनही फेसबुकची लोकप्रियता कायम आहे.
निक्केई आशियाच्या रिपोर्टनुसार, सर्वाधिक डाउनलोडसच्या बाबतीत टिकटॉकनंतर फेसबुक दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेसबुक पाठोपाठ व्हॉट्सअॅप तिसऱ्या, इंस्टाग्राम चौथ्या तर फेसबुक मेसेंजर पाचव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात बातमी आली होती कि टिकटॉक भारतात नवीन नावाने पुनरागमन करणार आहे.
TickTock ट्रेडमार्क
टिपस्टर मुकुल शर्माने ट्विट करून सांगितले कि, बाईटडान्सने 6 जुलैला “TickTock” नावासह टिकटॉकसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. या ट्रेडमार्क संबंधित किंवा देशातील टिकटॉकच्या पुन्हा एंट्री करण्याच्या बातमीबाबत बाईटडान्सने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, अॅप पुन्हा भारतात लाँच करण्यासाठी कंपनी सरकारशी बोलणी करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यासाठी कंपनी नवीन आयटी नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.