भारत सरकारने गेल्यावर्षी जुलैमध्ये TikTok आणि PUBG सह शंभराहून अधिक चिनी अॅप्स बॅन केले होते. यातील ऑनलाईन गेम PUBG ने भारतात Battleground Mobile India नावाने पुनरागमन केले आहे. असेच काहीसे प्रसिद्ध शॉर्ट व्हिडीओ अॅप TikTok देखील करणार असल्याची बातमी समोर आली आहे. भारतात पुन्हा एंट्री करण्यासाठी टिकटॉकची मालकी असेलेल्या बाईटडान्स कंपनीने नवीन नावासाठी ट्रेडमार्क फाईल केले आहे.
TickTock ट्रेडमार्क
टिपस्टर मुकुल शर्माने ट्विट करून सांगितले कि, बाईटडान्सने 6 जुलैला “TickTock” नावासह टिकटॉकसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. या ट्रेडमार्क संबंधित किंवा देशातील टिकटॉकच्या पुन्हा एंट्री करण्याच्या बातमीबाबत बाईटडान्सने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, अॅप पुन्हा भारतात लाँच करण्यासाठी कंपनी सरकारशी बोलणी करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यासाठी कंपनी नवीन आयटी नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
टिकटॉकचे दमदार पुनरागमन शक्य आहे का?
टिकटॉकचे भारतात 10 कोटींपेक्षा जास्त युजर्स होते आणि यातील हजरो लोक टिकटॉकवरून कमाई देखील करत होते. परंतु बंदी नंतर हे युजर्स अनेक स्वदेशी शॉर्ट व्हिडीओ अॅप्सवर विखुरले गेले आहेत. तसेच इंस्टाग्राम आणि युट्युबने देखील शॉर्ट व्हिडीओ सेगमेंट लाँच केले आहेत. त्यामुळे पुनरागमन करणाऱ्या चिनी शॉर्ट व्हिडीओ अॅपला गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.