टोरेटो कंपनीने स्मॅश या नावाने ब्ल्युटुथ कनेक्टीव्हिटी असणारा पार्टी स्पीकर भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
ब्लुटुथ कनेक्टीव्हिटी असणारे स्पीकर सध्या खूप लोकप्रिय झाले आहेत. यात स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येते. यातील बहुतांश स्पीकर हे ध्वनीची कमी तीव्रता असणारे असतात. अर्थात घर वा कार्यालयात यांचा वापर करता येतो. तथापि, आता याच प्रकारातील उच्च ध्वनीची क्षमता असणार्या स्पीकर्सलाही मागणी वाढू लागली आहे. या अनुषंगाने विविध उपकरणांच्या निर्मितीसाठी ख्यात असणार्या टोरेटो कंपनीने स्मॅश या नावाने नवीन पार्टी स्पीकर बाजारपेठेत लाँच केला आहे. नावातच नमूद असल्यानुसार पार्टीजमध्ये याचा वापर करता येईल. यातील ध्वनीची क्षमता ६० वॅट इतकी असल्यामुळे लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी याचा वापर करता येणार आहे. यात अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर चार ते पाच तासांपर्यंत याला वापरणे शक्य आहे. यामुळे अर्थातच विजेची सुविधा नसणार्या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी हा स्पीकर उपयुक्त ठरणार आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी यासोबत पॉवर अॅडाप्टर देण्यात आले आहे. या मॉडेलचे मूल्य १२,९९९ रूपये असून ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारांमध्ये याला उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात कुणीही विविध शॉपींग पोर्टल्ससह देशभरातील शॉपीजमधूनही याला खरेदी करता येणार आहे.
स्मॅश पार्टी स्पीकरमध्ये बास, ट्रॅबल आणि इको आदी इफेक्ट अॅडजस्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासोबत कराओके मायक्रोफोन देण्यात आला आहे. याचा वापर करून कुणीही आपल्याला हव्या असणार्या गाणांना म्हणता येणार आहे. यासोबत अजून एक बाह्य मायक्रोफोन कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यात ब्ल्युटुथ ४.२ तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना याच्याशी संलग्न करता येईल. अर्थात यावरील संगीताचा स्मूथ स्पीकरमधून आनंद घेता येणार आहे. याशिवाय युएसबी फ्लॅश ड्राईव्ह आणि मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्यामुळे कुणीही आपल्याकडील पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्डमधील संगीतही यावर ऐकता येईल. तसेच ऑक्झ-इनपुटची सुविधा आहे. यामुळे याचा वायरयुक्त स्पीकर म्हणूनही वापर करता येणार आहे. यासोबत रिमोट कंट्रोलदेखील दिलेला आहे. यावर गाण्यांचा ट्रॅक बदलण्यासह ध्वनी कमी-जास्त करता येणार आहे.