TRAI Action : भारतीय दूरसंचार प्राधिकरण, म्हणजेच TRAI ने स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी नियम अधिक कडक केले आहेत. नवीन नियमानुसार, 10 क्रमांकांचा गैरवापर थांबेल आणि टेलीमार्केट्सना नवीन नंबर सीरिजचे पालन करावे लागेल. याशिवाय, तुम्ही स्पॅम कॉल्स आल्यानंतर सहजपणे तक्रार करू शकाल, ज्यावर दंडात्मक कारवाईदेखील केली जाईल. याबाबत ट्रायने एक्स प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून माहिती दिली आहे.
ग्राहक संरक्षण सुधारण्यासाठी TRAI ने टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (TCCCPR), 2018 मध्ये सुधारणा केली आहे. यानुसार, ग्राहक 10 क्रमांकावरुन येणाऱ्या टेलीमार्केटिंग कॉलपासून मुक्त होऊ शकतील आणि रिपोर्टिंग प्रक्रिया देखील सुलभ करण्यास सांगितले आहे. यात टेलिकॉम कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा उल्लेख करण्यात आला असून, कंपन्यांनी मात्र या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
नवीन नंबर सिरीजचा वापर TRAI ने कमर्शियल कम्युनिकेशनसाठी 10 नंबरचे मोबाईल नंबर आधीच ब्लॉक केले आहेत. यासाठी 140 आणि 1600 मालिकेपासून नवीन क्रमांकाची मालिका सुरू करण्यात येणार आहे. 140 क्रमांकाची सिरीज प्रमोशनल कॉलसाठी वापरावी लागेल, तर 1600 क्रमांकाची सिरीज व्यवहाराशी संबंधित कॉलसाठी वापरावी लागेल.
नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटरवर कारवाईट्रायच्या नव्या निर्णयानंतर अनोंदणीकृत टेलिमार्केटर्सवर आळा घालण्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे. जर टेलीमार्केटरने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केले तर 15 दिवसांसाठी निलंबन केले जाईल, तर पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास टेलिकॉम संसाधन 1 वर्षासाठी डिस्कनेक्ट केले जाऊ शकते.
दूरसंचार कंपन्यांनाही दंड टेलिकॉम ऑपरेटरनाही दंडाला सामोरे जावे लागू शकते. या दंडाची सुरुवातीची रक्कम 2 लाख रुपये असेल, जी 5 लाखांपर्यंत जाऊ शकते. चूक पुन्हा आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दरम्यान, दूरसंचार कंपन्यांची संघटना असलेल्या COAI ने दूरसंचार कंपन्यांवरील दंड वाढवण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे.