अलीकडे काही मोबाईल युजर्सना कॉल येत आहेत ज्यामध्ये लोकांना त्यांचे मोबाईल नंबर बंद करण्याची धमकी दिली जात आहे. हे कॉलर्स टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे (TRAI) कर्मचारी किंवा त्याच्या संबंधित एजन्सीचे सदस्य असल्याचं सांगत आहेत. सरकारी एजन्सी ट्रायने याबाबत आता स्पष्ट माहिती दिली आहे.
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एजन्सी कोणत्याही मोबाईल युजर्सना त्यांचा नंबर ब्लॉक किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी कॉल करत नाही. तसंच त्यांनी कोणत्याही एजन्सीला तसं करण्यास सांगितलं नाही. असे कॉल स्कॅमर्सकडून केले जात आहेत आणि त्यांच्यापासून सावध राहा.
TRAI ने ट्विटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात एक प्रेस रिलीज शेअर केलं आहे. ट्रायच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी ही प्रेस रिलीझ शेअर केली आहे. स्कॅमर्स सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर सिम घेण्याची धमकी देत आहेत असं प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.
TRAI चे सेक्रेटरी व्ही रघुनंदन यांनी TRAI च्या Telecom Commercial Communication Customer Preferences Regulation (TCCCPR) 2018 नुसार, सर्व्हिस प्रोव्हायडर फ्रॉड कॉल्स आणि असे मेसेज पाठवणाऱ्या नंबरवर कारवाई करू शकतात असं म्हटलं आहे.
सर्वसामान्य व्यक्ती थेट नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊ शकते किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकते. अलीकडच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत. हल्ली स्कॅमर्स कधी पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवतात, तर कधी पार्सल किंवा कुरिअरचे आमिष दाखवतात. इतकेच नाही तर लोकांना घाबरवण्यासाठी सीबीआय, कस्टम ऑफिसर असल्याचं सांगून फोन करत आहेत.