नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एक मोठा आणि नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. यामुळं मोबाईल युजर्सना महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी जास्त पैसे खर्च करावं लागणार नाहीत. दरम्यान, टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायनं (TRAI) एक प्रस्ताव आणला आहे.
या प्रस्तावातंर्गत मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आधी सारखे प्लॅन्स म्हणजेच फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएस असे प्लॅन्स सादर करतील. सध्या भारतातील जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या बहुतेक प्लॅनमध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात. जरी युजर्सना इंटरनेट डेटाची आवश्यकता नसली तरीही, त्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो. ज्यासाठी त्यांना इंटरनेट डेटाचा वापर नसला तरीही अतिरिक्त पैसे मोजावं लागतात.
या कारणास्तव ट्रायनं आता एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे, ज्या अंतर्गत टेलिकॉम कंपन्यांना जुन्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएस प्लॅन सुरू करण्यास सांगितले आहे. यासाठी ट्रायनं सल्लापत्र (कंसल्टेशन पेपर) जारी केलं आहे. ट्रायनं या कंसल्टेशन पेपरला रिव्ह्यू ऑफ टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन २०१२ वर जारी केलं आहे. तसंच, ट्रायनं या प्रस्तावावर आपल्या भागधारकांचं मत मागवलं आहे.
ट्रायचा हा प्रस्ताव सामान्य युजर्ससाठी एक मोठं पाऊल ठरू शकतो. ट्रायला पुन्हा एकदा व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस प्लॅनवर टेलिकॉम कंपन्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, जिओ, एअरटेल, व्ही आणि बीएसएनएल यासारख्या टेलिकॉम कंपन्यांच्या सर्व रिचार्ज प्लॅनमध्ये जास्तकरून इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची सुविधा दिली जाते.
अशा परिस्थितीत, अनेक युजर्स इंटरनेट डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची आवश्यकता नाही. त्यांना फक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेची गरज आहे, परंतु तरीही युजर्सना या सर्व बेनिफिट्ससह प्लॅन्स खरेदी करावं लागतं, ज्यासाठी त्यांना खूप पैसे खर्च करावं लागतात. त्यामुळं आता ट्रायचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा सर्वसामान्य युजर्सना मोठा फायदा होऊ शकतो. अनेक यूजर्सचे बरेच पैसे वाचू शकतात.