नवी दिल्ली : ट्रायने (TRAI) देशातील १२० कोटी मोबाईल युजर्सना फेक कॉल्सपासून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्पॅम कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरने अलीकडेच कमर्शियल कम्युनिकेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता टेलिकॉम रेग्युलेटर मोबाईल युजर्ससाठी एक नवीन DND (डू-नॉट-डिस्टर्ब) ॲप आणणार आहे, ज्याद्वारे युजर्स आपल्या फोनवर येणारे व्यावसायिक कॉल्स आणि मेसेज बंद करू शकतील.
अलीकडच्या काळात फेक कॉल्स आणि मेसेजच्या माध्यमातून होणाऱ्या वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर टेलिकॉम रेग्युलेटरने हा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, ट्रायचे हे ॲप पुढील वर्षी लाँच केले जाऊ शकते. टेलिकॉम रेग्युलेटरने सर्व भागधारकांना DND ॲपच्या नवीन एआय (AI) फीचर्सची टेक्निकल फिजिबिलिटी तपासण्यास सांगितली आहे. स्टेकहोल्डर्सद्वारे या टेक्निकल फिजिबिलिटी पूर्ण केल्यानंतर दोन महिन्यांनी ॲप लाँच केले जाईल.
टेलिकॉम कंपन्यांनी एआय स्पॅम फिल्टर लाँच केल्यानंतर सुमारे 800 संस्था आणि 18 लाखांहून अधिक मोबाइल नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत. टेलिकॉम ऑपरेटर एआय फिल्टरद्वारे नेटवर्क स्तरावर बनावट कॉल ब्लॉक करत आहेत. दरम्यान, ब्लॉकिंग युजर्स स्तरावर देखील व्हायला हवे, ज्यासाठी डीएनडी ॲप अपग्रेड करणे आवश्यक आहे, असे ट्रायचे म्हणणे आहे.
सध्या युजर्स डीएनडी ॲपद्वारे युजर्स आपल्या कमर्शियल कम्युनिकेशनच्या प्रिफरेंसला सेट करू शकतात. याशिवाय, युजर्स कोणत्याही स्पॅम कॉलची तक्रार करू शकतात, परंतु ही कारवाई सर्व्हिस प्रोव्हायडर्स स्तरावर केली जाईल. नवीन DND ॲपद्वारे अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशनला कंट्रोल केले जाऊ शकते.
ट्रायने 2016 मध्ये DND ॲप लाँच केले होते. हे ॲप फेक कॉल्स थांबवण्यासाठी लाँच करण्यात आले होते, परंतु हे ॲप जास्त युजर्सना आकर्षित करू शकले नाही. ट्राय आता हे ॲप अपग्रेड करणार आहे, जेणेकरून अधिकाधिक मोबाइल युजर्सना त्याचा लाभ मिळू शकेल. एवढेच नाही तर टेलिकॉम रेग्युलेटरने बनावट कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी अलीकडेच धोरणात अनेक बदल केले आहेत.