रेल्वेने प्रवास करण्यासाठी जेव्हा आपण तिकीट काढण्यासाठी वेबसाईटवर जातो, तेव्हा पेमेंट करताना एवढा वेळ लागतो की त्या वेळात सर्व तिकिटे फुल झालेली दिसतात. हा प्रकार गणपतीच्या सुटीत किंवा गर्दीच्या काळात दिसून येतो. तसेच तात्काळ तिकिटे काढतानाही ही समस्या अनेकदा जाणवते. परंतू आयआरसीटीसीने यावर जबरदस्त तोडगा काढला आहे.
तिकिटे काढताना वेळ लागला तर पैसे कापले जायचे आणि तिकिट काही मिळत नव्हते. हे पैसे पुन्हा परत मिळविण्यासाठी खूप वेळ लागायचा. आता तसे होणार नाही. तिकीटही झटक्यात बुक होईल आणि रद्द केलेल्या तिकिटाचे पैसेही झटकन तुमच्या खात्यात वळते होतील अशी सोय आयआरसीटीसीने केली आहे. IRCTC eWallet आधीपासून सेवेत आहे.
परंतू आता आयआरसीटीसीने आपला स्वत:चा पेमेंट गेटवे आणला आहे. IRCTC-iPay या नावाने रेल्वेने आपला गेटवे आणला आहे. यापूर्वी IRCTC iPay Means हा दुसऱ्या कंपनीकडून दिला गेलेला गेटवे होता. यामुळे पैशांचे व्यवहार होण्यास विलंब लागत होता. आता IRCTC-iPay मुळे अन्य बँकांच्या पेमेंट गेटवेवरून झटपट पेमेंट वळते होणार आहे. यामुळे तिकिटी बुकिंगला लागणारा वेळही वाचणार आहे. याचबरोबर तिकीट रद्द केल्यास त्याचे पेमेंटही प्रवाशाच्या खात्यात काही क्षणांत येणार आहे.
वेटिंग तिकीटाचे काय?अनेकदा वेटिंग तिकीट असेल तर ट्रेनचा फायनल चार्ट जोवर बनत नाही तोवर तिकिट कन्फर्म झालेय की नाही हे समजत नाही. जर कन्फर्म झाले नाही तर ते तिकीट रद्द केले जाते. अशावेळी रिफंड येण्यास वेळ लागत होता. काहीवेळा काही दिवस, आठवडे लागत होते. ते पैसे आले की नाहीत हे देखील अनेकांना कळत नव्हते. आता तसे होणार नाही, तिकीट रद्द झाले की त्याचा रिफंड तातडीने दिला जाणार आहे.