मुंबई, दि. 24 - आपल्या युजर्ससाठी सतत बदल करण-या फेसबुकने एक नवं फिचर आणलं आहे. या फिचरमुळे फेसबुक अॅपमधूनच 360 डिग्री फोटो काढणं शक्य होणार आहे. फेसबुकवर 360 डिग्री फोटो अपलोड करण्याची आणि तो पाहण्याची सोय आधीपासूनच उपलब्ध आहे. जवळपास वर्षभरापुर्वी हे अपडेट करण्यात आलं होतं. पण फेसबुक अॅपमधूनच फोटो काढायचा असल्यास, 360 डिग्री फोटो काढण्याची सोय उपलब्ध नव्हती. पण आता फेसबुकने युजर्सना ही सोयही उपलब्ध करुन दिली आहे. आयओएस आणि अॅड्रॉईड मोबाइलवर हे फिचर उपलब्ध आहे. त्यामुळे आता 360 डिग्री फोटोसाठी दुसरं अॅप किंवा कॅमे-याची गरज भासणार नाही.
फोनचा कॅमेरा 360 डिग्री फोटो काढता येईल इतका चांगला नाही मग फोटो कसा काढायचा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. फोनच्या कॅमेरामध्ये ज्याप्रमाणे आपण पॅनोरमा काढतो त्याचप्रमाणे हा फोटो काढायचा आहे. फेसबुक अॅपमधून 360 डिग्री फोटो काढायचा असल्यास, न्यूज फीडमध्ये जाऊन स्क्रोल करा. तुम्हाला '360 फोटो' असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल 360 डिग्री फिरवून हवी ती इमेज कॅप्चर करा. यावेळी तुम्हाला हवी असलेली गोष्ट फोटोच्या मध्यभागी असेल याची काळजी घ्या. फोटो काढून झाल्यानंतर नेमका फोटो कुठून हवा आहे म्हणजे त्याचा स्टार्टिंग पॉईंट ठरवून घ्या आणि पब्लिश करा. तुम्ही हा फोटो कव्हर फोटो म्हणूनही ठेवू शकता.
तुम्ही फोटो काढून डायरेक्ट तुमच्या टाईमलाईन किंवा हव्या त्या अल्बममध्ये अपलोड करु शकता. याशिवाय फेसबुकने काही नवे फिचर्सही यामध्ये अॅड केले आहेत. तुम्ही इमेज झूम करुन तुमच्या मित्रांनाही टॅग करु शकता.
फेसबुकचं हे नवं अपडेट फक्त फोटोपुरतं मर्यादित आहे. फेसबुक 360 डिग्री व्हिडीओलाही सपोर्ट करतं, मात्र त्यासाठी सॅमसंग गेअर 360, इन्स्टा 360, निकॉन की मिशन 360 सारखे कॅमेरे असणं गरजेचं आहे. तसंच व्हिडीओ काढून झाल्यानंतर ते वेगळे अपलोड करावे लागतात.