सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने धूम माजवली आहे. मोबाईलला वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन सारख्या शोधांमुळे स्मार्टफोन आणखीनच स्मार्ट होत चालले असताना आता टीव्ही क्षेत्रातही अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले आहे. सॅमसंग एक असा टीव्ही बनवित आहे जो मनात विचार जरी आला तरीही चॅनेल बदलणार आहे. म्हणजेच रिमोट कंट्रोलची गरज उरणार नाही.
सॅमसंग हे तंत्रज्ञान विकसित करत आहे. यासाठी स्वित्झरलँडच्या इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी-लॉसेन (EPFL) च्या न्यूरोप्रोस्थेटिक्स केंद्रासोबत करार केला आहे. या प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट प्वॉइंट्स’ असे नाव देण्यात आले आहे.
सॅमसंग या प्रोजेक्टवर गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहे. पुढील वर्षी असा अनोखा स्मार्ट टीव्ही प्रायोगिक तत्वावर येणार आहे. या तंत्रज्ञानानुसार केवळ विचार केल्याकेल्याच चॅनल बदलणार आहे. एवढेच नाही तर टीव्हीटा आवाजही कमी-जास्त करता येणार आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तंत्रज्ञ मेंदूचे कार्य समजावून घेत आहेत. शिवाय डोक्यातून निघणाऱ्या लहरींनाही समजण्याचा प्रयत्न करत आहेत. टीव्ही पाहताना व्यक्ती काय विचार करतात आणि कसे कार्य करतात याचाही अभ्यास केला जात आहे.