नवी दिल्ली : ट्विटर आणि त्यासंबंधित निर्णयांबाबत अनिश्चिततेचा काळ सुरू आहे. पुन्हा एकदा कंपनीचे नवीन सीईओ इलॉन मस्क यांनी स्वतःचा निर्णय बदलला आहे. रिपोर्टनुसार, लोकांना ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
इलॉन मस्क यांनी सोमवारी सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर डुप्लिकेट आयडी थांबवता येतील याची खात्री जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत ब्लू टिक व्हेरिफिकेशनचे री-लाँचिंग थांबविले जाईल. दरम्यान, ब्लू टिक सबस्क्रिप्शन प्लान 29 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी केली होती. आता सोमवारी इलॉन मस्क यांनी केलेल्या घोषणेनंतर ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरू होण्यास वेळ लागू शकतो.
इतकेच नाही तर इलॉन मस्क यांनी सोमवारी सांगितले की, कंपनी वैयक्तिक अकाउंटपेक्षा संस्था आणि कंपन्यांसाठी वेगवेगळ्या रंगाचे टिक वापरू शकते. कंपनी त्यावर काम करत आहे. लवकरच या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल. रिपोर्टनुसार, ट्विटर कर्मचार्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत इलॉन मस्क म्हणाले की, " 8 डॉलर प्रतिमहा असलेल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन प्लॅनला लाँच करण्याची वेळ अद्याप स्पष्ट नाही. जोपर्यंत ती महत्त्वाची पॅरोडी अकाउंट थांबण्याची खात्री नाही, तोपर्यंत आम्ही ते लाँच करणार नाही."
दरम्यान, इलॉन मस्क यांनी ट्विटर घेताच पहिली मोठी घोषणा केली ती म्हणजे पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन, पण पहिल्या दोन दिवसात लोकांनी या सेवेचा गैरवापर केला. त्यामुळे अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. यानंतर कंपनीने पेड सबस्क्रिप्शन बंद केले होते. काही सुरक्षा आणि गोपनीयता धोरणे मजबूत करून 29 नोव्हेंबरला ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन पुन्हा लाँच केले जाईल, असे कंपनीने सांगितले होते. 29 नोव्हेंबरची तारीख स्वत: इलॉन मस्क यांनी घोषित केली होती, परंतु आता ट्विटरच्या समोर या प्लॅनमध्ये अजूनही अनेक सुरक्षेचे प्रश्न आहेत. त्यामुळे कंपनी हे लगेच पुन्हा लाँच करू इच्छित नाही.