गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्यामुळे चर्चेत असलेलं ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. डेस्कटॉप, ॲप दोन्हीवरून युझर्सना ट्वीट करण्यात समस्या येत आहेत. downdetector.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान हजारो लोकांनी ट्विटर डाऊन असल्याची माहिती दिली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे कंपनीचे नवे मालक इलॉन मस्क आणि त्यांचे अनेक मोठे, कठोर निर्णय. ट्विटरने गेल्या महिन्यात ब्लू टिक व्हेरिफिकेशन आणि प्री-व्हेरिफाइड अकाउंट्ससाठी पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली. इलॉन मस्क यांच्यावरही बहुतांश युजर्सनी टीका केली आहे. ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेणाऱ्या युजर्सनाही अनेक खास फीचर्स मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय इलॉन मस्कने ट्विटरची मालकी घेताच कंपनीचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह हजारो कर्मचाऱ्यांना त्यांनी नारळ दिला होता.
ऑक्टोबरमध्ये 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर, मस्क यांनी ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन सुरू करण्याच निर्णय घेतला होता. परंतु काही बनावट खात्यांवरही ब्ल्यू टीक असल्याने याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा लाँच केलेल्या सेवेची किंमत वेब ग्राहकांसाठी प्रति महिना 8 डॉलर्स आणि आयफोन ग्राहकांसाठी 11 डॉलर्स प्रति महिना असेल.