Elon Musk , Twitter: ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून एलॉन मस्क काही ना काही घोषणा करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यांपासून ते छाटणीपर्यंतची विविध गोष्टी कंपनीत सुरू आहेत. त्यावरून मस्क यांच्यावर टीकादेखील केली जात आहे, पण एलॉन मस्क हे स्वतःच्या पद्धतीने कंपनी चालवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. याचदरम्यान, मस्क यांनी शनिवारी ट्विटरवर कंटेंट मॉडरेशन (Content Moderation) संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ट्विटरच्या नवीन धोरणात युजर्सना मत मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल पण त्या विचारांच्या Reach बाबतचे स्वातंत्र्य नसेल. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर मस्क यांनी ही घोषणा केली.
सामुहिक राजीनाम्यांची चिंता नाही!
शुक्रवारी शेकडो ट्विटर कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. मस्क यांनी ट्विटरचा कारभार चालवायला घेतल्यापासून आठवडाभरात कंपनीचे कर्मचारी संख्या निम्म्यावर आली आहे. शेकडो कर्मचार्यांनी अंतिम मुदतीपूर्वी कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर, मस्क म्हणाले की मला अशा गोष्टींची चिंता नाही, कारण सर्वोत्तम कर्मचारी अजूनही माझ्या कंपनीत कार्यरत आहेत. मस्क यांनी ट्विटरवर लिहिले की, 'ट्विटरच्या नव्या धोरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Speech) आहे पण Freedom of Reach (तुमची पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचेल याचे स्वातंत्र्य) नाही. द्वेषयुक्त आणि नकारात्मक ट्विट शक्य तितके डिबूस्ट केले जातील आणि वेळप्रसंगी त्यावर 'अर्थपूर्ण' कारवाई केली जाईल. Twitter वर कोणतीही जाहिरात किंवा कमाईचे अन्य साधन उपलब्ध होणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीसाठी विशेष शोध घेत नाही, तोवर ते ट्विट सापडणार नाही."
बनावट खात्यांसाठी कठोर पाऊल!
Twitter नवीन खात्यांना ९० दिवसांसाठी ब्लू सबस्क्रिप्शन सेवा खरेदी करण्याची परवानगी देणार नाही. द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, याचा अर्थ युजर्स नवीन अकाउंट व्हेरिफाय करू शकणार नाहीत. घोटाळे आणि बनावट खात्यांची शक्यता कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. अहवालानुसार, जुन्या प्लॅनमध्ये प्रतीक्षा कालावधीचा उल्लेख नव्हता, परंतु 9 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर तयार केलेली Twitter खाती यावेळी Twitter Blue चे सदस्यत्व घेऊ शकणार नाहीत असे स्पष्ट संकेत आहेत. नवीन ट्विटर ब्लू पेज म्हणते की प्लॅटफॉर्म भविष्यात कोणत्याही सूचना न देता नवीन खात्यांसाठी प्रतीक्षा कालावधी लागू करू शकते.