Twitter Elon Musk: Twitterचे नवे मालक Elon Musk दररोज नवनवे निर्णय घेत आहेत. यातच आता मस्क यांनी ट्विटरबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. मस्क यांनी सांगितले की, ते कंपनीत येण्यापूर्वी ट्विटर आपल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खाण्या-पिण्यावर दरवर्षी 13 मिलियन डॉलर्स म्हणजेच सूमारे 1 अब्ज रुपये खर्च करत होते. मस्क यांच्या दाव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, तर एका माजी कर्मचाऱ्याने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
इलॉन मस्क यांनी दोन आठवड्यांपूर्वी ट्विटरचा ताबा मिळवला. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. यातला सर्वात मोठा निर्णय म्हणजे ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे आकारणे. या शुल्काचा वाद सुरूच असतानाच त्यांनी कंपनीतून मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांना काढून टाकल्याने मस्क वादात सापडले आहेत. यानंतर आता त्यांनी खाण्या-पिण्याच्या खर्चाचा आकडा सांगून नवीन चर्चांना तोंड फोडले आहे. तसेच, त्यांनी हा खर्च कमी करण्याबाबतही भाष्य केले आहे.
माजी कर्मचाऱ्याने केला खुलासाकंपनीची माजी कर्मचारी ट्रेसी हॉकिन्स यांनी मस्क यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. ट्रेसी हॉकिन्स ट्विटरमध्ये फूड प्रोग्रामचे काम पाहत होत्या, नुकतच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. हॉकिन्स यांनी एका ट्विटमध्ये माहिती दिली की, 'मस्क खोटं बोलत आहेत. ट्विटरच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज लंच आणि मीटिंगसाठी 20-25 डॉलर्स दिले जातात.' दरम्यान, मस्क यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, 'ट्विटरचे कर्मचारी वर्षभर कार्यालयात आले नाहीत. तरीदेखील त्यांच्या लंचवर सुमारे $400 खर्च होतात.'