नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन बदल करत आहे. व्हॉट्सअॅपनंतर आता ट्विटरने देखील एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे ट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
ट्विटरच्या सुरक्षा टीमने एक ट्वीट करून नवीन नियमांची माहिती दिली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार कोणताही ट्विटर युजर एका दिवसांत 400 हून अधिक नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. याआधी ही मर्यादा 1000 होती. 'फॉलो, अन फॉलो, कोण करते? स्पॅमर. एका दिवसांत तुम्ही फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या आम्ही 1000 वरून 400 वर आणली आहे. स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही,' असे ट्विटरने ट्वीट करून म्हटले आहे.
Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी
लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे. तसेच सोशल मीडियाने निवडणूक आयोगाच्या जागरूकता कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. ट्विटरचा हा खास इमोजी 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये भारताच्या संसदेचा एक फोटो फीचर करण्यात आला आहे. ट्विटरने लोकसभा निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी पुढे ठेवण्यासाठी एका खास इमोजीची (भावनात्मक संकेत चिन्ह) सुरुवात केली आहे. निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे. मतदानासंदर्भात त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर
सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.